जुन्नर : येडगाव येथील खानेवाडी परिसरात असलेल्या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. कल्याणी सुखदेव झिटे असे या चिमुरडीचे नाव आहे.
येडगाव येथे रामदास भिकाजी भोर यांच्या शेतजमिनीमध्ये सुखदेव झिटे या मेंढपाळाचा मेंढ्यांचा कळप बसविलेला होता. पहाटेच्या सुमारास मेंढपाळ सुखदेव झिटे मेंढ्यांसह आपली पत्नी व दोन लहान मुलींसह उघड्यावर झोपले होते. पहाटे 3 च्या सुमारास बिबट्याने चार महिन्यांच्या बालिकेवर हल्ला करून तिला उचलून नेले. 5 च्या सुमारास वनविभागाचे पथक घटनास्थळी आले. ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे व त्यांचे कर्मचारी, झिटे, ग्रामस्थ यांनी बिबट्या ज्या दिशेला गेला त्याच्या आधारे शोध घेतला असता अर्ध्या किमी अंतरावर या बालिकेचा मृतदेह मिळून आला, अशी माहिती उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिली.
आमदारांनी केली घटनास्थळाची पाहणी
वनविभागाचे पथक, नारायणगाव पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी करून झिटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे युवानेते अमित बेनके यांनी त्यांनीही घटनास्थळाला भेट दिली. उपाययोजनांसंदर्भात येडगावचे सरपंच गणेश गावडे, देविदास भोर, गणेश बांगर, सुखदेव नेहरकर, दीपक भिसे, समीर गावडे आदी ग्रामस्थांशी चर्चा केली. वनविभागाने नरभक्षक बिबट्याला त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. येडगाव व परिसर हा बिबट वावर असलेले क्षेत्र आहे. या परिसरात ऊस, चिकू, मका, गहू अशी बागायती व दीर्घकालीन पिके घेतली जातात. यामुळे या परिसरात बिबट्यांच्या अधिवासास अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे बिबट या ठिकाणी स्थिरावलेले आहेत. या परिसरात पिंजरे लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना वनविभागाने दिले.