वन्यजीव विभागाच्या ढिसाळ कारभाराने हिंस्रप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव
रावेर- तालुक्यातील केर्हाळा भागातील शेत-शिवारात बिबट्याने दोन गोर्हयांचा फडश्या पाडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. केर्हाळा, मंगळूर, जुनोने या गाव खेड्यांच्या शेत-शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार असून काही महिन्यांपूर्वीही बिबट्याचे दर्शन घडले होते. शनिवारीदेखील भरत पाटील यांच्या जुनोने येथील शेतात गुरांचा कळप मुक्कामी असताना पहाटेच्या सुमारास दोन गोर्ह्यांवर बिबट्याने झडप घालत त्यांची शिकार केली. अहिरवाडी येथील वनपाल एस.के.सोनवणे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर वन्यजीवांच्या पावलांचे ठसे घेतले असता तो बिबट्याच असल्याचे स्पष्ट झाले.
पाण्याअभावी हिंस्त्र प्राण मानवी वस्तीकडे
पाल अभरण्यात अनेक पट्टेदार वाघ, अस्वल, बिबट्यांसारखे हिंस्त्र प्राणी असून जंगलात या प्राण्यांना पाणी व शिकार मिळत नसल्याने हे हिंस्र प्राणी गाव-खेड्याकडे धाव घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. केर्हाळा, मोरगांव, खानापूर, अटवाडे येथील शेत-शिवारामध्ये बिबट, तडस, पट्टेदार वाघससारख्या हिंस्र प्राण्यांचे दर्शन घडूनही वन्यजीव विभागाने यातून कोणताही धडा घेतला नसल्याची टिका होत आहे. सुदैवाने आतापर्यंत हिंस्र प्राण्याने मानवी वस्तीवर हल्ला केलेला नाही मात्र भविष्यात अप्रिय घटना टळण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वन्यजीव विभागाचा ढिसाळ कारभार
राज्य सरकार अभयारण्य व प्राण्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी वन्यजीव विभागाला देतेे. जंगलात जागो-जागी पाणवठे तयार करणे, त्यांच्या आहाराची व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी वन्यजीव विभागाची आहे परंतु एकूणच वन्यजीव विभागाच्या सुस्त कारभारामुळे संताप व्यक्त होत आहे.