बियाणे खरेदीकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

0

जळगाव । खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. शेती मशागतीचे काम देखील पुर्ण होत आले आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात बि-बियाणे बाजाराला बहर येत असते. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या बि-बियाण्याची खरेदी एप्रिल महिन्यातच शेतकरी करतो. मात्र यंदा वेगवेगळ्या कारणाने शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीकडे पाठ फिरविली आहे. मे महिन्याचा दुसरा पंधरवडा उलटूनही बियाणे बाजार थंडच आहे. शेतकरी बियाणे खरेदी करत नसल्याने जिल्हाभरातील यंदाजे 250 ते 300 कोटी रुपयांचा बियाणे बाजार ठप्प झाला आहे. शेतकर्‍यांकडून बि-बियाणे खरेदी केली जात नसल्याने कृषी केंद्रांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

पाहिजे असलेले बियाणे
काही ठिकाणी बोगस बियाणे आढळले असल्याने शासनाने 24 कापूस बियाण्यावर बंदी आणली आहे. शेतकर्‍यांकडून अधिक मागणी असलेले बियाण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. शेतकर्‍यांना पाहिजे असलेले बियाणे बाजारात उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. काही बियाण्यावरील बंदी उठण्याचा प्रतिक्षेत शेतकरी आहे. तसेच तापमानाची तिव्रता मोठी असल्याने लागवड लांबली आहे.

बीटी बियाण्याची मागणी अधिक
जळगाव जिल्ह्यात कापसाचे लागवड क्षेत्र मोठे आहे. जिल्ह्यात दरवर्षी लाखो बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी असते. बीटी कापसाच्या बियाण्याच्या खरेदीने मोठी उलाढाल होत असते. मका, ज्वारी, सोयाबीन आणि इतर खरिपाच्या पिकांच्या बियाण्याची उलाढाल देखील मोठी आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विविध कंपन्यांच्या बियाणे पाकिटांची नोंदणी विक्रेत्यांकडून करण्यात येते. एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश शेतकरी बियाणे आणि सोबत रासायनिक खतांची खरेदी करीत असतात.

कर्ज मिळत नसल्याने अडचण
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हा खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज घेत असतो. नवीन पिक कर्ज घेण्यासाठी मागील वर्षी घेतलेल्या पिक कर्जाची शेतकर्‍याने भरणा केले आहे. मात्र यावेळी जिल्हा बँक शेतकर्‍याला लवकर कर्ज पुरवठा करत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बि-बियाणे खरेदी न करण्यामागे कर्ज मिळत नसल्याचे सर्वात मोठे कारण आहे.

बागायत लागवड लांबली
वेळेवर कर्ज मिळत नसल्याने आर्थिक अडचणी अभावी, तापमानाची तिव्रता अधिक असल्याने ठिंबक सिंचनात अडचण तसेच काही कापूस बियाण्यावर बंदी असल्याने बागायत शेती लागवड लांबणीवर गेली आहे. बागायत शेती लागवड लांबल्याने बागायतदार शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते आहे. पुरेसा पाणी उपलब्ध असतांनाही काही अडचणींमुळे बागायत शेती लागवड लांबणीवर गेली आहे.