बिया कचर्‍यात टाकू नका; आम्हाला द्या आम्ही रोपे देऊ

0

हरित वसुंधरा व पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम

रावेत : सध्या फळांचा मोसम जोरात सुरू आहे. सर्वांच्या घरांमध्ये फळांचा वापर होत असतो. आपण फळे खातो व बिया टाकून देत असतो. आंबे, फणस, जांभळे, करवंद खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया कचर्‍यात टाकू नका. त्या स्वच्छ धुवून ठेवा आणि पावसाळ्यात जाताना- येताना रस्त्यांच्या कडेला, माळरानावर टाका. अथवा आम्हाला द्या. आम्ही त्यांची रोपे तयार करून तुम्हाला देऊ. तसेच त्यांची लागवड करू, असे आवाहन ‘निसर्गराजा मित्र जिवांचे’ संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील काही पर्यावरणप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवित आहेत. काही तरुणांनी नऊ वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ते ‘हरित वसुंधरा व पर्यावरण रक्षणा’साठी
झटत आहेत. विविध पर्यावरणविषयक उपक्रम ते वर्षभर राबवीत आहेत.

संगोपनाची काळजीही
यामध्ये वनौषधींची लागवड, रोपे तयार करणे, वृक्षारोपण करणे, ती जगविणे, निर्माल्य संकलन, त्यापासून सेंद्रिय खत तयार करणे, नदी स्वच्छता, पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्याचा पाण्याची व्यवस्था करणे, जंगलातील दुर्मीळ झाडांच्या बिया जमा करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. त्याला हातभार लावत रावेत येथील सुजाता दत्तानी यांनी त्यांना जागा दिली आहे. तेथे नर्सरी सुरू केली असून, तेथे रोपे तयार करून मोफत दिली जातात. वृक्षारोपणानंतर त्यांच्या संगोपनाची काळजीही हे तरुण घेतात. दरवर्षी ते एक दुष्काळी गाव दत्तक घेऊन तेथे पाण्याची सोय करणे, वृक्षारोपण, वाचनालय आदी विकासकामेही करण्यावर या तरुणांचा भर असतो. या पूर्वी कलेढोण (ता. खटाव, जि. सातारा) हे गाव दत्तक घेऊन तेथे त्यांनी पिण्याचा पाण्याची सोय केली आहे.

दत्तक गावात वृक्षारोपण
या तरुणांनी सासवड तालुक्यातील हिवरे (जि. पुणे) गाव दत्तक घेतले आहे. तेथील वाघ डोंगरावर 11 हजार झाडे लावली आहेत. सध्या तेथे जैवविविधतेने नटलेले उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. झाडांना पाणी देण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेच्या 10 टाक्या बसविल्या आहेत. काही झाडांसाठी ठिबक सिंचन केले आहे.