एकदा कोणी भविष्यवेत्ता बादशहाला येऊन भेटला व त्याने भाकीत केले. त्यानुसार लवकरच बादशहाचा मृत्यू व्हायचा होता. ही भविष्यवाणी ऐकून बादशहा अस्वस्थ होऊन गेला. त्याचे खाण्यापिण्यावरून लक्ष उडाले. दिवसरात्र आपला मृत्यू बादशहाला दिसू लागला. अवघ्या दरबारी सरदारांचेही कामातून लक्ष उडाले होते. बादशहाला कसा वाचवावा, याची प्रत्येकाला फिकीर लागली होती. त्या कालखंडत माध्यमे, वर्तमानपत्रे किंवा वाहिन्या नव्हत्या म्हणून! अन्यथा सलग त्यावर बादशहाच्या मृत्यूविषयी पॅनेल चर्चा रंगल्या असत्या. पण सुदैवाने तेव्हा विज्ञानाने तितकी प्रगती केलेली नव्हती, की अशी प्रसिद्धी साधनेही विकसित झालेली नव्हती. त्यामुळे अशी खळबळ बादशहाचा दरबार किंवा राजाचा गोतावळा इथपर्यंतच मर्यादित राहिलेली होती. अशा कुठल्याही संकटावर मात करणारा एक बुद्दू माणूस दरबारात ख्यातकीर्त होता. त्यालाच सर्व दरबार्यांनी साकडे घातले. त्याचे नाव बिरबल! तो आपल्या तारतम्यासाठी ओळखला जायचा. त्याने आधी येऊन सगळी माहिती घेतली. विचार केला आणि मगच दरबारात भविष्यवेत्त्याला बोलावून घेतले. दरबारातच त्याची भविष्यवाणी पुन्हा सांगायला भाग पाडले. मग खुद्द त्या ज्योतिषाचे आयुष्य किती आहे, असाही प्रश्न सहज विचारला. तेव्हा आपण अजून पन्नास वर्षे जगणार असल्याचेही त्या भविष्यवेत्त्याने सांगितले. तेव्हा बिरबलाने पुन्हा पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारून खात्री करून घेतली. ज्योतिषी ठामपणे आपण आणखी पन्नास वर्षे जगणार असल्याचे सांगत होता आणि आपल्या भविष्यवाणीचीही हमी देत होता. मग बिरबलाने थेट आदेश दिला, की आज संध्याकाळी या ज्योतिषाचार्याचे मुंडके उडवा. त्याच्या आदेशाकडे बादशहासहित तमाम दरबारी चकित होऊन बघू लागले. पण बिरबल आपल्या आदेशावर ठाम होता, तर तिथे हजर असलेल्या भविष्यवेत्त्याची गाळण उडाली होती.
अखेर बादशहाने हस्तक्षेप केला. कारण तो भविष्यवेत्ता गयावया करून जीवाची भीक बादशहाकडे मागत होता, बादशहाला त्याची दया आली होती. त्यानेही बिरबलाला प्रश्न केला, या बिचार्या ज्योतिषाचा काय गुन्हा आहे? त्याचे मुंडके कशाला उडवायचे? तर बिरबल उत्तरला, मुंडके उडवून काय होणार आहे? ज्योतिषी आणखी पन्नास वर्षे हमखास जगणार आहे. मुंडके उडवल्यामुळे तो मरण्याची अजिबात शक्यता नाही. त्याचे भविष्य भाकीत खरे असेल, तर त्याचे मुंडके उडवण्याने त्याचे कुठलेही नुकसान संभवत नाही. याच्या भाकितामुळे खुद्द बादशहा मरू शकत असेल, तर त्याच्याच भाकितानुसार त्यालाही पन्नास वर्षे अन्य कुठल्याही कारणाने मृत्यू येऊ शकत नाही. तेव्हा त्याने उगाच गयावया करण्याची काहीही गरज नाही. आपल्या शब्दावर आणि भाकितावर विसंबून हसतमुखाने मुंडके उडवणार्याला सामोरे जावे. त्यात विचलित होण्यासारखे आहेच काय? जो दुसर्यांच्या मृत्यूचे भाकीत इतके खात्रीपूर्वक सांगतो, त्याला आपल्या जगण्याविषयी आत्मविश्वास असलाच पाहिजे. तेव्हा खाविंद चिंता करू नका, मुंडके उडवून हा ज्योतिषी अजिबात मरणार नाही. बादशहालाही बिरबलाचा युक्तिवाद पटला. त्यानेही टाळी वाजवून बिरबलाला दाद दिली आणि ज्योतिषाला साक्षात घाम फुटला. तो बिरबलाच्या पाया पडून माफी मागू लागला आणि आपले प्राण वाचवण्याचे साकडे घालू लागला. मग बिरबल म्हणाला, आधी तू बादशहाच्या घोषित मृत्यूपासून मुक्त कर, मग मी तुला अभय देतो. तत्काळ ज्योतिषाने बादशहाला आणखी कित्येक वर्षे मृत्यूचे भय नसल्याचे भाकीत बदलून दिले आणि आपली सुटका करून घेतली. त्याचे ज्योतिष वा भाकीत खोटे किंवा खरे याच्याशी बिरबलाला कर्तव्य नव्हते. आपल्या भाकिताविषयी बौद्धिक युक्तिवाद पुरेसा नसतो. त्याविषयी आत्मविश्वास असला पाहिजे. मगच पांडित्य सांगायचे असते. या भाकीतकर्त्या भविष्यवेत्त्याचा आपल्या शास्त्र वा पांडित्यावर खरंच विश्वास असता, तर त्याला बिरबलाच्या आदेशाची भीती बाळगण्याचे काहीही कारण नव्हते. कारण भविष्य त्याचा मृत्यू इतक्यात नसल्याची ग्वाही देत होते. ही गोष्ट फक्त त्या भोंदू भविष्यवेत्त्यापुरती मर्यादित नसते. शब्दांचे बुडबुडे उडवून पुस्तकी पांडित्य सांगणार्या प्रत्येक अतिशहाण्याची तशीच अवस्था असते. त्यांचे प्रभावशाली वाटणारे शब्द किंवा आग्रह, जोवर त्यांच्या अंगाशी येणारे नसतात, तोपर्यंतच त्यांचा आग्रह पक्का असतो. जिथे त्यांच्या तत्त्वज्ञानाचा वा विचारांचा विपरीत परिणाम भोगायची वेळ येते, तिथे तत्त्वज्ञान गळपटू लागत असते. अंगात आणलेला आवेश मावळू लागत असतो.
तमाम मानवाधिकार सांगणारे किंवा पुरोगामी शांततावादी बाष्कळ बडबड करणारे त्या कथेतील भोंदू भविष्यकर्तेच असतात. कारण त्यातली भाकिते वा परिणाम हे त्यांच्या वाट्याला येणारे नसतात. म्हणून त्यांना अन्य कुणाचा प्रत्यक्ष अनुभव वा त्यातल्या यातनांपेक्षाही आपले शब्द अधिक मोलाचे वाटत असतात. मग तो अनुभव काश्मिरात अंगावर दगड झेलत बंदोबस्त करणारे पोलीस वा लष्करी अधिकारी असोत किंवा अन्य कुठल्या सरकारी कामात गुंतलेले कर्मचारी असोत. परदु:ख शीतलम म्हणतात तसे यांचे पांडित्य असते. म्हणूनच जो अनुभव काश्मिरात वा अन्यत्र भारतीय सैनिकांना येत असतो, त्याच अनुभवातून जाऊन बघा म्हटले, की ते आपले काम नसल्याची पळवाट शोधली जात असते. तिथे शांतता वा मानवाधिकाराचे अवसान गळू लागते. कारण कुठलेही अधिकार नुसते पुस्तकात असून भागत नाही. त्याचा वापर करण्यामागे शक्ती उभी करावी लागते. ती शक्ती म्हणजे सरकार होय. ते सरकार नागरिकांचे अधिकार सुरक्षित ठेवते म्हणजे काय करते? ती शक्ती सरकारजवळ कुठून येते? ही शक्ती म्हणजे काय असते? मुंबई असो किंवा काश्मीर असो. तिथल्या नागरिकाचे अधिकार पुस्तकात आहेत, म्हणून त्याला ते वापरता येत नाहीत. त्याच्या अधिकारावर कोणीही शिरजोरी करू शकतो. नागरिकाच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा कोणी असेल, त्याला गप्प करणे वा रोखणे म्हणजे गालगुच्चा घेणे नसते. बळाचा वापर करूनच अशा लोकांना शांत करावे लागते ना? म्हणजेच अधिकार हा बलप्रयोगानेच सिद्ध होत असतो आणि ज्यांच्याजवळ बळ नाही, त्यांच्यावरील अतिक्रमण रोखायला अशी शक्ती सरकारजवळ असावी लागते. त्या शक्तीला पोलीस, सैनिक वा लष्कर म्हणतात. त्या यंत्रणा बलप्रयोग करतात, तोवरच प्रभावी असतात आणि त्यांच्या अमानुष वागण्याचा धाकच अन्य मुजोरांना गप्प करीत असतो. तो धाकच सामान्य नागरिकाच्या खर्या अधिकारांची हमी देत असतो. कारण कुठलाही कायदा पुस्तकात छापला म्हणून अमलात येत नसतो किंवा प्रभावी ठरत नसतो. तो कायदा लादणारी शक्ती ज्याच्याजवळ असते, त्यालाच लोक सरकार म्हणून ओळखत असतात. मग असे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेले असो किंवा लष्करी बळावर प्रस्थापित झालेले असो. सरकार हे बलप्रयोगातूनच सरकार ठरत असते. त्याचे बळ म्हणजेच सत्ता असते आणि असे कुठलेही अधिकार सरकारला नसतील, तर त्याचे कुठलेही कायदे कोणी जुमानणार नाही. मग ते कायदे महसुलाचे असोत किंवा मानवाधिकाराचे असो. कायदा म्हणजे बळाचा वापर करणारी सत्ता असते आणि तिच्या हुकमतीतून अन्य सगळे कायदे अमलात येऊ शकत असतात. ती सत्ता वा तिची हुकमतच दुबळी करून टाकली, तर सरकार संपते आणि कायद्याचे राज्यही संपते. बिरबलाची तलवार मुंडके उडवणार हे सत्य समजल्यावर भाकिताचे पांडित्य निकालात निघते. त्यापेक्षा मानवाधिकाराची पोपटपंची किंचितही वेगळी नसते, हे इसिसच्या प्रभावक्षेत्रात पांडित्य सांगायला गेलेल्यांना अनुभवास आलेले आहेच ना?