जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांचा प्रश्न नवीन राहिलेला नाही तरीही अनेक ठेवीदार हे आपल्या हक्काच्या पैशासाठी टाचा घासत-घासत गेले, काहींना उतारवयात रस्त्यावर यावे लागले हेही विसरता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर बीएचआर संस्थेतील कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा उघडकीस येत असताना त्यावर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन काही बोलणार की, नाहीत ? असा प्रश्न जनमानसात विचारला जाऊ लागला आहे. बीएचआर घोटाळ्यातील संशयितांनी सुनियोजित व संघटीतपणे गंभीर गुन्हा केला आहे. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल किंमतीत स्वतःच्या घशात घातल्या आहेत. या सर्व कारवाईत गिरीश महाजन यांच्या नावाचे लेटरपॅड हे संशयित आरोपी सुनील झंवरकडे मिळाल्याची चर्चा आहे. काही का असेना ? बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजन यांनी ठेवीदारांची बाजू घेत अवसायक जितेंद्र कंडारे, व्यावसायिक सुनील झंवर यांच्यासह इतर आरोपींविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असल्याचा सूर उमटू लागला आहे. शेतकर्यांच्या कापसाला दर मिळाला पाहिजे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तंबू ठोकून बसणारे गिरीश महाजन यांनी बीएचआर ठेवीदारांच्या जिव्हाळ्याच्या विषयात आज मूग गिळून गप्प बसणे अनाकलनीय आहे. त्यांचे हे मूक राहणे अनेक शंका-कुशंकांना जन्म घातल्याशिवाय राहणार नाही.