पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाला गती : न्यायालयात खटल्यावर ५ डिसेंबरपासून होणार सुरुवात
जळगाव : शहरातील एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह संस्थेच्या २०१५ मधील घोटाळ्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात ५ डिसेंबर पासून कामकाज सुरुवात होत आहे. दुसरीकडे अवसायक कंडारेसह ठिकठिकाणी छापे टाकून ट्रकभर पुरावे घेवून परतलेल्या पुणे आर्थिक गुन्हे आर्थिक शाखेकडून तपासाला गती मिळाली असून अंत्यत बारकाईने अभ्यास केला जात आहे. कवडीमोल दरात विक्री झालेल्या बीएचआरच्या मालमत्तांचा शोध घेतला असून ती खरेदी करणारेही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासाअंती मालमत्ता जप्त करुन चौकशीअंती कायदेशीर प्रक्रिया होवून ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळणार असल्याची माहिती या क्षेत्रातील तंज्ञांकडून मिळाली आहे.
राज्यभरातील ठेवीदारांचे लागले लक्ष
बीएचआरच्या राज्यभरात ९ राज्यांमध्ये शाखा आहे. २२ हजार संस्थेचे सभासद असून २५ हजार शेअर होल्डर्स आहे तर दीड लाख नॉमीनल शेअर होल्डर्स आहे. आपल्या कष्टांची कमाईतून राज्यभरातील ठेवीदारांनी आपल्या ठेवी बीएचआरच्या मध्ये ठेवल्या. मात्र बीएचआर अवसानात गेल्यानंतर अनेक ठेवीदारांची निराशा झाली. राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होवून संस्थेच्या संचालकांना अटक झाली. बीएचआर बुडाल्याने आपल्या हक्काच्या ठेवी बुडाल्या त्या आत परत मिळणार नाही, असा ठेवीदारांचा समज झाला होता. मात्र त्याच वेळी शासनाकडून बीएचआरवर प्रशासक म्हणून जितेंद्र कंडारेंची नियुक्ती झाली. काही कालावधीतच कंडारेची अवसायक म्हणून निवड झाली. यानंतर ठेवीदारांना आपल्या ठेवी मिळणार अशी आशा लागली. संघटनेच्या माध्यमातून ठेवीदार रस्त्यावर उतरले. मात्र कुंपनानेच शेत खाल्ले याप्रमाणे मालमत्ताच्या लिलाव करुन कंडारेने झोल केला. तर दुसरीकडे आंदोलनाचे नेतृत्व करणार विवेक ठाकरे यानेही कंडारेशी हातमिळवणी करुन ठेवीदारांचा विश्वासघात करुन आशेवर पाणी फिरविले. यादरम्यानच्या काळात आयुष्यभराची कमाई ,जमापुंजी ठेवीच्या स्वरुपात बुडाल्याने अनेक ठेवीदारांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. तर काही ठेवीदार २०१५ पासून आपल्या हक्काच्या ठेवी आज मिळेल उद्या अशी आशा लावून बसले आहेत.
कोणताही ठेवीदार ठेवींपासून वंचित राहणार नाही
बीएचआरच्या संचालकांना विरोधात राज्यभरात गुन्हे दाखल होवून त्यांना अटक झाली. यानंतर न्यायालय काय निर्णय घेते याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले. तर दुसरीकडे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केल्या कारवाईमुळे ठेवीदारांच्या आशा पुन्हा जीवंत झाल्या आहेत. ज्याच्यावर ठेवीदारांच्या ठेवी मिळूवन देण्याची जबाबदारी होती, त्यांना आरोपी करुन गुन्हे दाखल झाले. काहींना अटक झाली. आता याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधितांनी कवडीमोल भावात विकलेल्या बीएचआरच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर ज्यांनी या मालमत्ता खरेदी केल्या आहेत त्यांनाही आरोपी करुन त्यांच्याकडून मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही ठेवीदारांना गुंतवलेल्या ठेवीपेक्षा कमीप्रमाणात पैसे मिळालेले. तर पैसे पैसे संबंधित ठेवीदारांना मिळाल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली. याबाबतही आर्थिक गुन्हे शाखेकडून सूक्ष्म पध्दतीने अभ्यास सुरु आहे. चौकशी तसेच तपासाअंती कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यावर प्रत्येक ठेवीदाराला आपल्या हक्काच्या ठेवी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बीएचआर फसवणूक प्रकरणात ५ डिसेंबर रोजी सुनावणी
बीएचआर पतसंस्थेकडून झालेल्या फसवणूक प्रकरणात अटकेतील प्रमोद रायसोनीसह १३ संचालकांबाबत ५ डिसेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे.ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी हे संचालक जिल्हा कारागृहात आहेत. राज्यभरातील ८१ गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू आहे. या १३ संचालकांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीआयडीकडूनही तपास सुरू असून काही गुन्ह्यांचे दोषारोप, पुरवणी दोषारोप न्यायालयात दाखल केले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या खटल्याच्या नियमित सुनावणी थांबल्या होत्या. आता ५ डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणीस सुरूवात होणार आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके काम पाहत आहेत. पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई व दुसरीकडे जिल्हा न्यायालयात सुरु होत असलेले कामकाज यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कारवाईसह जिल्हा न्यायालयाच्या निकालाकडे राज्यभरातील ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.