यावल। एखाद्या विद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबरोबर प्राचार्यांनी त्याची मतदार नोंदणी करावी, असे फर्मान राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्यातील सर्व महाविद्यालयांना पत्र दिले आहे. तसेच महाविद्यालयात नोंदणी होणार्या नवमतदारांची माहिती बीएलओंनी घ्यावी, अशा सूचना गुरूवारी झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. 1 ते 31 जुलैदरम्यान तालुक्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी)कडे वयाच्या पुराव्यानिशी अर्ज द्यावयाचा आहे.
ही मोहीम अधिक परिणामकारकपणे राबवता यावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देतानाच नवमतदारांचे अर्ज भरून घ्यावेत, असे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन व्हावे, यासाठी तहसीलदार हिरे यांनी गुरुवारी सर्व 203 बीएलओंची बैठक घेतली. तसेच सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावे, अशा सूचना दिल्या. नायब तहसीलदार योगिता ढोले, निवडणूक शाखेचे डी.के. पाटील उपस्थित होते.
मतदारांनी लाभ घ्यावा
जुलै महिन्यात राबवण्यात येणार्या या उपक्रमात 8 व 22 जुलै रोजी सर्व 203 मतदान केंद्रांवर दिवसभर बीएलओ उपस्थित राहून मतदार नोंदणीचे काम करतील. या विशेष मोहिमेचा लाभ मतदारांनी घ्यावा. प्रामुख्याने ज्या तरुणांनी नाव नोंदणी केलेली नसेल, त्यांनी पुढाकार घ्यावा.
95 जणांना कारणे दाखवा
मतदार यादी अद्ययावत करताना तालुक्यातील रावेर चोपडा या विधानसभा मतदार संघातील मृत, दुबार नावे असलेली तब्बल अडीच हजार मतदारांची नावे कमी झाली आहेत. मात्र, त्यात चुकीने एखाद्याचे नाव कमी झाले असेल तर त्यांनी मतदार यादी पाहून तत्काळ दुरुस्ती सुचवावी. बैठकीत अनुपस्थित राहिलेल्या 95 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.