चाळीसगाव- भारत निवडणूक आयोगाचा मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असताना त्यासाठी बीएलओ नेमणुकीचे आदेश स्विकारण्यास नकार देणार्या दोघा शिक्षकांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता तर आतापर्यंत तब्बल 13 शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आदेश स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर गुन्हे
मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी बीएलओ नियुक्तीचे आदेश काढले होते ते आदेश बजावण्यासाठी गटशिक्षण अधिकारी यांच्या कडे दिले असता शिक्षक आदेश स्विकारण्यास नकार देत असल्याचे सांगीतल्याने तलाठ्या मार्फत ते आदेश बजावण्याचा प्रयत्न केला मात्र काही शिक्षकांनी स्विकारले नाहीत अशा 13 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलास देवरे यांनी दिली. हातगाव जि.प.शाळेचे शिक्षक रतन नागो पांचाळ, घोडेगाव जि.प.शाळेचे शिक्षक प्रशांत जयराम पाटील यांनी दिनांक 29 जून 2018 रोजी आदेश स्विकारले नाहीत म्हणुन त्यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तहसीलदार कैलास देवरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मनोज पाटील, पोलीस नाईक गणपत महिरे करीत आहेत.
शिक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात
13 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील दोन शिक्षकांवर 13 जुलै रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला शनिवार, 14 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वाघले, ता.चाळीसगाव जि.प.शाळेचे शिक्षक देवसिंग श्रावण परदेशी यांनी 30 जून व लोंजे जि.प.शाळेचे शिक्षक राजेश शामराव पवार यांनी 10 जुलै 018 रोजी आदेश न स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध तहसीलदार कैलास देवरे यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दररोज गुन्हे दाखल होत असल्याने शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.