भुसावळात खासदारांनी घेतली मॅरेथॉन बैठक : रेल्वे समस्यांबाबत डीआरएम यांच्याशी केली चर्चा
भुसावळ- शहरातील विविध बँकांमधून दिल्या जाणार्या मुद्रा लोनमध्ये एजंटांचा सुळसुळाट वाढला असून ऑनलाईन नोंदणी करावी, ग्राहकांना सन्मानजनक वागणूक द्यावी तसेच बीएसएनएल नेटवर्कबाबत ग्रामीण भागात तक्रारी वाढल्याने त्याचे तातडीने निरसन करावे, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी शहरात बुधवारी आयोजित बँक व बीएसएनएल अधिकार्यांच्या बैठकीत केल्या. या बैठकीनंतर त्यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांची भेट घेवून रेल्वे प्रवाशांना भेडसावणार्या समस्यांविषयी चर्चा करीत विविध समस्या सोडवण्याची मागणी केली.
बीएसएनएल व बँक अधिकार्यांची झाडाझडती
जळगाव जिल्ह्यातील बँकामध्ये बीएसएनएल चे इंटरनेट वापरले जाते, गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा खंडित होत असल्याकारणाने बँक ग्राहकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे, याबद्दल च्या तक्रारी खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे येत असल्याकारणाने बँक आणि बीएसएनएल अधिकार्यांची संयुक्त बैठक खासदार रक्षाताई खडसे यांनी भुसावळ येथे घेतली.
अडवणूक थांबवून शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज द्या
खासदार खडसे यांनी बीएसएनएल कार्यालयातील शहरातील विविध बँकांच्या प्रतिनिधींची तसेच बीएसएनएल अधिकार्यांची बैठक घेतली. शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे तसेच केळी पीक विम्याचा लाभ शेतकर्यांना तातडीने मिळावा, अशा सूचना त्यांनी केल्या. बँकेच्या कर्मचार्यांकडून ग्राहकांना उर्मट वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने अशा कर्मचार्यांवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी करीत मुद्रा लोनसाठी बँकांमध्ये एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने यापुढे ऑनलाईन नोंणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. थकीत मुद्रा लोन वसुलीसाठी काय उपाय योजना आहेत? याबाबत त्यांनी माहिती जाणून घेत प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा घेतलेल्यांची संख्या किती आहे व क्लेम करताना अडचणी येऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रधानमंत्री आवास योजनेच्या व्याजाच्या सबसीडी संदर्भात जनजागृती व्हावी आणि येणार्या अडचणी सोडवल्या जाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बीएसएनएलचे अधिकारी धारेवर
ग्रामीण भागात बीएसएनएलची रेंज मिळत नसल्याने ग्राहक वैतागल्याचे सांगून खडसे म्हणाल्या की, अनेकदा टॉवर बंद असतानाही दखल घेतली जात नाही तर नोफानची प्रगती, जोडलेल्या ग्रामपंचायतीचा आढावा व लवकर काम पूर्ण करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या. कुर्हाकाकोडा भागात बीएसएनएलबाबत अनेक तक्रारी असून मंजूर झालेल्या नवीन टॉवरचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
समस्या सोडवा -खासदार खडसे
खासदार खडसे यांनी डीआरएम यादव यांची भेट घेवून विविध समस्या मांडत त्या सोडवण्याची मागणी केली तसेच भुसावळ रेल्वे विभागात सुरू असलेल्या कामांचा आढावाही घेतला. वाघोड रेल्वे स्थानकावरील पाण्याची समस्या सोडवण्यासह वरणगाव स्थानकावर दादर्याचे काम करावे, भुसावळसह रावेर, सावदा, मलकापूर, वरणगाव, बोदवड, नांदुरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी वॉटर वेेंडींग मशीन बसवावे, भुसावळ, रावेर, बोदवड व मलकापूर स्टेशनच्या सौंदर्यीकरणाबाबत आढावा घेवून भुसावळ, रावेर, सावदा, बोदवड वरणगाव व मलकापूर स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याबाबत तातडीने कारवाई करण्याबाबत त्यांनी मागणी केली. प्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील, रावेरचे कमलाकर महाजन यांची
उपस्थिती होती.