पुणे । शिरुर पंचायत समितीच्या बीओटी तत्त्वावर सुरू असलेल्या इमारत बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थगिती देण्याचा आदेश नुकताच काढला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे शिरुर बीओटीच्या इमारत बांधकामासाठी ना हरकत दाखला मिळावा, अशी मागणी केली आहे.
पथकिनारावर्ती नियमानुसार परवानगी न घेता नियमांचा भंग करून शिरूर पंचायत समितीचे बीओटी तत्वावर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंताने सुरू असलेले काम थांबविण्याचे आदेश उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिले आहेत. शिरूर बीओटी प्रकल्पाला परवानगी नसतानाही कामकाज करण्यात आले आहे, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानुसार प्रकल्पाची चौकशी करण्यात आली असून, सुरू असलेले बांधकाम कायदेशीर असल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला होता.रस्त्याच्या मध्यापासून 19.50 मीटर ते 37 मीटर अंतरावरील बांधकाम 13 मीटर पेक्षा कमी उंचीचे असल्याने पथकिनारावर्ती नियमाचा भंग होत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेशी कोणतीही चर्चा न करता बांधकाम नियमांचा भंग करून चालू असलेले बांधकाम बंद करण्याबाबत उपअभियंतांना कळविले आहे. त्यामुळे याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.