बीडगावातील तिघा माय-लेकींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अडावद : कुटुंबात हिस्से वाटणीवरून झालेल्या वादानंतर 38 वर्षीय कुटूंब प्रमुखाने विष प्राशन केले होते तर पतीने उचललेल्या टोकाच्या पावलानंतर पती नसल्याने आता जगून काय करायचे ? या विवंचनेत पत्नीनेदेखील आठ व चार वर्षीय मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे बुधवारी रात्री उशिरा घडली होती. दरम्यान, मयत झालेल्या तिघाही माय-लेकींवर खंबाळे, ता.शिरपूर येथे गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना गहिवरून आले.

एकाचवेळी तिघांचा झाला होता मृत्यू
कौटुंबिक वादानंतर वर्षा विनोद कोळी (35), त्यांची मुलगी किर्ती (8) व मोनिका (4) यांनी विहिरीत उडी घेतल्याने तिघांचा मृत्यू ओढवला होता तर कुटुंबप्रमुख विनोद कोळी (40) यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.