पुणे : बीडमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडल्यानंतर सर्व पोलिसांना दोष देतात. मात्र, त्यामागे राजकीय हस्तक्षेप असतो, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्त्या निलम गोर्हे यांनी केले. कुटुंबाच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने भर रस्त्यात बहिणीवर आणि तिच्या पतीवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर त्या पुण्यात बोलत होत्या.
बीडमधील घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर तसेच बीड एसपीची भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. बीडमध्ये एखादी घटना घडल्यास पंकजा मुंडे संबंधीत कुटुंबाची भेट घेतात. मात्र, मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मुंडे यांनी पुरुषांचे प्रबोधन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच राजकीय हस्तक्षेपाला न डगमगता पोलिसांनी निःपक्षपातीपणे काम करावे, असेही त्या म्हणाल्या.