पुणे । चांदणी चौकातील जैव वैविधता उद्यानातील (बायो डायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) पन्नास एकर (वीस हेक्टर) जागेचा प्रश्न शिवसृष्टीनिमित्ताने सुटला आहे. तरी 958 हेक्टर बीडीपी क्षेत्राबाबतचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन घ्यावा असे शासनाने सांगितले असले तरी बीडीपीबाबत मतमतांतरे आहेत. बीडीपी क्षेत्रातील जागाधारकांचे नुकसान होत असून शासनाने आता शिवसृष्टीच्या निमित्ताने या आरक्षणाच्या मोबदल्याचा तातडीने निर्णय घेऊन जागा मालकांना 100 टक्के आरक्षण मोबदला द्यावा, अशी मागणी नागरी हक्क संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
23 गावांमधील बांधकामे
शिवसृष्टीच्या निर्णयामुळे बीडीपीचा निर्णय निर्णायक पातळीवर आला आहे. त्यामुळे या जागेसाठी टीडीआर द्यायचा, एफएसआय द्यायचा, की मोबदला द्यायचा? हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यातच, नगरविकास विभागाने नुकताच टेकडी उतारावर 30 मीटर व खाली बांधकामास परवानगी रद्द केलेली आहे. हा निर्णय तातडीने बदलावा लागणार आहे. त्यातच, यापूर्वी बीडीपीमध्ये झालेले 23 गावांमधील बांधकामे, हिल-टॉप हिल स्लोपवरील निवासी घरे यांनाही दिलासा मिळणे आवश्यक असून त्याबाबतही निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
शहरातील टेकड्या वाचविण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने महापालिकेने सन 2006 मध्ये टेकड्यांवरील 978 हेक्टर जागेवर बीडीपीचे आरक्षण प्रस्तावित केले. आरक्षणाचा हा प्रस्ताव अनेक वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सत्तेच्या काळात प्रलंबित राहिला होता. सन 2015मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आरक्षित जागा ताब्यात घेताना किती आणि कसा मोबदला द्यायचा, बीडीपी क्षेत्रात किती टक्के बांधकामांना परवानगी द्यायची हा प्रस्ताव प्रलंबितच ठेवण्यात आला.
बांधकामा-संदर्भात निर्णय
दरम्यान बीडीपीच्या उर्वरित जागेसंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत बांधकामासंदर्भात काय निर्णय घ्यायचा हे निश्चित करण्यात येईल, असे कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.