पिंपरी चिंचवड : बीड आणि परळी येथून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या मोठ्या फरकाने निवडून येतील, त्यांना कोणीही हरवू शकत नाही, असा विश्वास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या आठवणीतील मुंडे साहेब या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यमंत्री पंकजा मुंडे, आजी माजी आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा
धनंजय मुंडे यांच्यावर टीका…
जानकर म्हणाले की, जो कोणी व्हॉट्स अॅपवर म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला चॅलेंज देऊन सांगतो की बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर जानकर यांनी टीका केली. यावेळी जानकार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘भगवी वस्त्र घातले तर महाराज बनेल मला कुठला स्वार्थ नाही, त्यामुळे पंकजा ताईंना सोडण्याचं कारणच नाही’ असंही जानकर म्हणाले. तसेच, मुंडे यांच्यामुळे राजकीय क्षेत्रातील उंची वाढली. सर्वकाही रेडीमेड मिळाले असेही त्यांनी नमूद केले. बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे. असे म्हणत बारामतीमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जानकर यांनी व्यक्त केली आहे.