दिसपूर:देशात गो-हत्या आणि गोमांस विक्रीच्या केवळ संशयातून अनेक हल्ले झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान आता पुन्हा आसाममध्ये बीफ विक्रीच्या संशयातून एका मुस्लिम व्यक्तीला जमावाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शौकत अली (६८) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शौकत अली बीफ विक्री करत असल्याचा संशय आल्यानंतर जमावाने त्यांना जबर मारहाण केली व डुकराचे मांस खायला लावले.
सात एप्रिलला आसामच्या बिश्वनाथ चारीअली शहरात ही घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये शौकत अली चिखलामध्ये बसले असून त्यांना जमावाने चारही बाजूने घेरल्याचे दिसत आहे. तुम्ही बीफ विक्री का करता? तुमच्याकडे बीफ विक्रीचा परवाना आहे का? अशी जमावाकडून त्यांची उलटतपासणी सुरु असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.