बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी होणार

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी दिल्लीत होणार आहे. या सभेत आयपीएलमधून काढण्यात आलेल्या कोची टस्कर केरळ फ्रँचायझीला द्यावयाच्या असलेल्या 850 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई, भारतीय संघाचे आगामी दौरे, राजस्थान क्रिकेट संघटनेवरील बंदी पूर्णत: हटवण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. याशिवाय राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेला (वाडा) भारतीय क्रिकेटपटूंची चाचणी घेऊ न देण्याबाबत या सभेत एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या या सभेत 2019 ते 2021 दरम्यान भारतीय संघाच्या वेळापत्रक चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी ऑक्टोवर – नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यातील भारतीय संघाच्या वेळापत्रकासंदर्भात सदस्यांना माहिती देतील. या कालावधीत होणारे सामने मायदेशात होणार आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने सामन्यांच्या दिवसाचा कालावधी कमी करण्याची सूचना केली होती. विराटची या सूचनेवरही ऊहापोह होण्याची शक्यता आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती घेण्याचा अधिकार आहे, तशी ते घेऊ शकतात. मात्र, सामने खेळण्यासंदर्भात संघटनेला विशेषाधिकार मिळायला पाहिजे, असाही एक मतप्रवाह सदस्यांमध्ये आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका सदस्याने सांगितले की, क्रिकेटपटूंना मानधनही वाढवून पाहिजे आहे शिवाय त्यांना सामनेही कमी खेळायचे आहेत. या दोन्ही गोष्टी मान्य कशा होऊ शकतात. खेळण्यासाठी क्रिकेटपटूंवर कोणी जबरदस्ती करत नाही आहे. त्यांना जर थकवा जाणवत असेल तर ते आराम करू शकतात. या सदस्याने खेळण्याचे दिवस कमी केले, तर त्यातील व्यावसायिक संबंधही अधोरेखित केले आहेत. हा सदस्य म्हणाला की, खेळण्याचे दिवस कमी केल्यावर प्रसारण कंपन्याही नुकसानभरपाई मागतील. कोच्ची टस्कर केरळला 850 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यासाठी पैसे कुठून येणार? फ्युचर टूर प्रोग्राम आणि मानधनवाढीला मंजुरी सर्वसाधारण सभेतच मिळू शकते.