राजगुरूनगर । खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्याची मान्यता राज्यशासनाने नुकतीच दिली आहे. संस्थेच्या वतीने ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे, या हेतूने नूतन पदवी महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. नुकत्याच शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून पदवीस्तरावरील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विशेष लक्ष घालून या महाविद्यालयाला मान्यता मिळवून दिली.
आमदार गोरे यांचा सन्मान
आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना उच्च शिक्षणाची संधी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नवीन महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी मंत्रालय पातळीवरही विशेष प्रयत्न केले. संस्थेला नूतन महाविद्यालय स्थापनेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून आमदार सुरेश गोरे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.