ब्लॅकमेल ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. कोणीही आपल्याला तेव्हाच ब्लॅकमेल करू शकतो, जेव्हा आपण कुठल्या तरी भानगडीत फसलेले असतो. आपल्या हातून अनवधानाने कित्येक गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्याविषयी आपण सहसा बोलतही नाही. त्यात गुन्हा वा लज्जास्पद असे काही असेल, तर आपण शक्य तितके त्यावर पांघरूण घालत असतो. कुणाला त्याचा थांगपत्ता लागू नये याचीही काळजी घेत असतो, अशी माहिती अन्य कोणाला समजली, तर त्याच्या फायद्यासाठी अशी व्यक्ती त्याच माहितीला हत्यार बनवत असते. म्हणजे त्या माहितीचे काही धागेदोरे आपल्याला सांगून हुलकावण्या देत असते. मग ती माहिती जगाला समजू नये, म्हणून आपला जीव कासावीस होऊ लागतो. अशा कृतीला ब्लॅकमेल करणे म्हणतात. पण अशा गोष्टी करणारे इतके चतुर असतात, की अपुरी माहिती जगासमोर आणून ते आपल्याला घाबरवत असतात आणि हुलकावण्याही देत असतात. असा कोणी बदमाश काहीतरी जाहीरपणे बोलतो आणि आपली पाचावर धारण बसते. मग त्याचे तोंड बंद करण्यासाठी आपण किंमत मोजू लागतो. त्यात आणखी एक प्रकार वेगळाही असतो. त्यात ज्याचे पाप आहे त्याला आणि बोलणार्यालाच वास्तव ठाऊक असते. पण त्यातही आरोपकर्त्याला किती नेमकी माहिती आहे व किती माहिती खरी आहे, याविषयी आपण साशंक असतो. अशावेळी आपण त्याला दाद देत नाही. असा माणूस मग हुलकावण्या देत अर्धवट माहितीच समोर आणत असतो. थोडीथोडी माहिती जाहीर करून अशा बदमाश आपल्याला त्याच्या जाळ्यात ओढत असतो. एकप्रकारे उंदरामांजराचा त्यात खेळ चालतो. सध्या केजरीवाल आणि त्यांचाच शिष्य म्हणवून घेणारा मजी मंत्री कपिल मिश्रा, तोच खेळ खेळत आहेत. त्यापैकी कपिलने केलेल्या आरोपात किती तथ्य आहे? केजरीवाल कितीसे फसलेले आहेत?
कपिल मिश्रा या आम आदमी पक्षाच्या बडतर्फ मंत्र्याने रविवारी केजरीवाल या मुख्यमंत्र्यावर मोठा खळबळजनक आरोप करून धमाल उडवून दिली. तोच मुळात एक सापळा आहे. हा गृहस्थ स्वत:ला केजरीवाल यांना शिष्य मानतो. केजरीवाल काय करतील व कुठली चाल खेळतील, हे मी नेमके ओळखून आहे. म्हणूनच अतिशय सावधपणे मी पावले टाकतो आहे, असा या कपिलचा दावा आहे. तो गुरूकडून कोणती विद्या शिकला त्याचे उत्तर यातच सामावलेले आहे. केजरीवाल नेहमी आपण सर्वात इमानदार असल्याचा दावा करीत आले. पण तसे करताना त्यांनी अन्य राजकारणी व आपल्याच काही सहकार्यांनाही कुठल्या ना कुठल्या सापळ्यात अडकवलेले आहे. त्यांनी नेहमी लोकांनाही स्टिंग ऑपरेशन करण्याचे आवाहन केलेले आहे. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या अनेक सहकारी व अनुयायांनाही आपल्या जाळ्यात ओढून बांधून ठेवलेले आहे. आपल्याविरोधात कोणीही काहीही कधी बोलू नये, याची खबरदारी केजरीवाल कायम घेत आले. पण इतके सर्व करताना काहीजण तरी विश्वासातले ठेवावे लागतात. ज्याला केजरीवालची टोळी वा चांडाळचौकडी असे कपिल संबोधतो, अशा लोकांना तरी विश्वासात घेणे भाग आहे. अण्णा आंदोलन चालू असताना स्वामी अग्निवेश वा कासमी नावाचे मौलाना, यांना केजरीवालनी अशाच छुप्या कॅमेर्याचा वापर करून नामोहरम केलेले होते. आपल्याविरोधात जाऊ शकतील वा आव्हान देऊ शकतील, अशा लोकांना प्रसंगी ब्लॅकमेल करायची सज्जता केजरीवालनी सातत्याने राखलेली होती. कपिल मिश्रा तीच विद्या या गुरूकडून शिकलेला आहे. आपण गुरूची विद्या गुरूला दक्षिणा म्हणून देणार असल्याचे सांगण्यातला मथितार्थ त्यातच सापडू शकतो. कपिल मिश्रा आता आपल्या गुरूला ब्लॅकमेल करतो आहे. ते नाटक समजून घ्यायचे, तर कपिलची विधाने काळजीपूर्वक तपासली पाहिजेत.
केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांचा एक मंत्री सत्येंद्र जैन रोख दोन कोटी रुपये मुख्यमंत्र्याला देताना आपण बघितले आहे, अशी ग्वाही कपिल देतो. पण शुक्रवारी कपिल मुख्यमंत्री निवासात आलेलाच नव्हता, असा केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे. त्याने कुठला वार व कुठली वेळ ते सांगावे, असा हे अनुयायी आग्रह धरीत आहेत. त्यावर कपिलचे उत्तर सोपे आहे. केजरीवाल टोळी जे पुरावे नष्ट करू शकते, असा कुठलाही पुरावा माध्यमात सांगणार नाही. ती माहिती थेट सीबीआय वा तपास संस्थेलाच देऊ, हा कपिलचा खुलासा आहे. पण त्याचवेळी हे अनुयायी अधिक तपशील कशाला मागतात? इतके कशाला? असाही कपिलचा प्रश्न आहेच. त्याचा अर्थच दोन कोटी रुपये कॅशचा त्याचा दावा विश्वासार्ह नाही. पण त्यात तथ्य जरूर आहे. कपिल ते सिद्ध करू शकणार नाही. पण हा आरोप खरा असल्यानेच केजरीवाल टोळीची झोप उडालेली आहे. दोन कोटीचा कुठलाही पुरावा नसला, तरी त्या पैशाची कुठे व कशी विल्हेवाट लावली, त्याचे धागेदोरे कपिलपाशी असू शकतात. याची केजरीवाल गोटात भीती आहे. पण त्याहीपेक्षा अन्य बाबतीतले पुरावे काय असू शकतात, त्याची भीती मोठी आहे. सत्येंद्र जैन हे जमिनीचे व मालमत्तेचे व्यवहार करणारे व्यापारी होत आणि त्यांच्याच हाती नगरविकास खाते सोपवून केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप टिकणारा आहे. त्यातले कोणते पुरावे कपिलपाशी आहेत, त्याची भीती केजरीवाल यांना सतावते आहे. अशी अनाकलनीय भीतीच त्या गोटात निर्माण करण्याचा सापळा कपिल मिश्राने लावलेला आहे. त्याचा जितका इन्कार वा प्रत्यारोप केजरीवाल गोटातून होईल, तितके तेच त्यात फसत जाणार आहेत. म्हणूनच केजरीवाल त्यात एकही शब्द बोलायला राजी नाहीत, तर आपल्या अन्य सहकार्यांना पुढे करून हा मुख्यमंत्री तोंड लपवून बसला आहे.
ब्लॅकमेल करताना ठरावीक माहिती पुढे आणली जाते आणि तिचा इन्कार करण्याच्या नादात संबंधित व्यक्ती अधिकाधिक गुरफटत जाते. त्यातून त्याला माघार घेता येणार नसते. म्हणूनच मौन हे सर्वोत्तम साधन असते. केजरीवाल म्हणून मौनव्रती झाले आहेत. त्यांना कपिल कोणता गेम खेळतोय, ते नेमके कळलेले आहे. कुठली कुठली माहिती वा पुरावे कपिलने गोळा करून मग दगा दिला, त्याची चिंता केजरीवाल गोटाला सतावते आहे. त्यातले किरकोळ धागेदोरे कपिल एक एक करून जाहीर करतो आहे, तर त्यातले मोक्याचे धागेदोरे मात्र गुलदस्त्यात ठेवतो आहे. पण याच निमित्ताने सत्येंद्र जैन यांना आयकर खात्याने दिलेल्या नोटीसांचा बोलबाला सुरू झाला आहे. केजरीवाल यांच्या नातलगाची जमीन खरेदी समोर आलेली आहे. पंजाब वा दिल्ली पालिका उमेदवारीसाठी पैसे मागण्यात आल्याचा गवगवा झाला आहे. याखेरीज विविध टेंडर्स वा सरकारी कामाच्या कंत्राटात कुठे कोणी पैसे वसूल केले, त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे कपिलपाशी नसतील असे आज छातीठोकपणे कोणी सांगू शकत नाही. दोन वर्षे मंत्रिपदी असलेला कपिल शर्मा सरकारच्या अनेक फायली राजरोस मिळवू शकत होता आणि त्याच्या झेरॉक्स प्रतीही काढून घेऊ शकत होता. मग त्याने कुठली कागदपत्रे जमा करून ठेवलीत, याची भीती केजरीवाल टोळीला सतावणारच ना? याला ब्लॅकमेल म्हणतात. केजरीवाल टोळीने आता एका एका प्रकरणाचा इन्कार करावा आणि मग त्याचेच पुरावे कपिल जाहीर करणार आहे. ब्लॅकमेलर आपल्याच सापळ्यात कसे फसतात, त्याचा उत्तम नमुना काही वर्षांपूर्वी तरुण तेजपाल याच्या निमित्ताने गाजला होता. त्याची आज आठवण येते. कपिल मिश्राला पुढे करून कोणीतरी केजरीवालचा तरुण तेजपाल करतो आहे, अशी शंका येते, तेजपालचे नेमके काय झाले होते? ते उद्या तपासू या.