पुणे । पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बुधवार पेठेतील आणखी 5 कुंटणखाण्यांना सील ठोकले आहे. यातील तीन कुंटणखान्यावर तीन वर्षे तर उर्वरीत दोन कुंटणखाणे एक वर्षासाठी सील करण्यात आले आहेत. अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम (1956) मधील कलम 18 व 20 च्या तरतुदीनुसार हे कुंटणखाणे सीलबंद करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच फरासखाना पोलिसांच्या हद्दीतील आठ कुंटणखाने सील केले होते. यावर्षात आतापर्यंत 20 कुंटणखाने सील करण्यात आले आहेत.शुक्ला यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शहरातील अवैध धंद्यावर कारवाई सुरू होती.
अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधवारपेठेत सज्ञान तसेच अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय चालत असणार्या कुंटणखान्यांवर छापे टाकण्यात आले. याप्रकरणी पिटा अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून सतत अवैध्यरित्या सुरू असणारे कुंटणखाने सीलबंद करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे प्रस्ताव पाठण्यात आला होता. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी यावर्षात आतापर्यंत 20 कुंटणखाने सीलबंद केले आहेत.
आणखी कुंटणखाने करणार सीलबंद
अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम (1956) तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी व अति. दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच, अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम (1956) मधील कलम 18 व 20 च्या प्रयोजनासाठी अति. जिल्हादंडाधिकारी यांचे अधिकार देखील त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करून पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हे कुंटणखाने सीलबंद केले आहेत. तर, आणखी काही कुंटणखाने सीलबंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.