बुराई मध्यम प्रकल्पातून पाणी सोडावे

0

जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश
धुळे: बुराई मध्यम प्रकल्पातून साक्री आणिशिंदखेडा तालुक्यातील सहा गावांसाठी आरक्षित 53.72 दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
बुराई मध्यम प्रकल्पातील 53.72 दशलक्ष घनफूट पाणी साक्री तालुक्यातील दुसाने, बळसाणे, सतमाने, कढरे तसेच शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी, देवी अशा सहा गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी केली आहे तर जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव केला आहे. तसेच साक्रीचे तहसीलदार यांनी टंचाई सदृश परिस्थितीबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आदेश देण्यात आले आहेत.
या धरणातील पाणी साक्री व शिंदखेडा तालुक्यातील गावांपर्यंत घेवून जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती), उपअभियंता वीज महावितरण कंपनी, पोलिस निरीक्षक, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, तलाठी/ ग्रामसेवक यांची संयुक्तरित्या राहील. पाटबंधारे विभागाने त्यांच्या स्तरावर अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक स्थापन करावे. या पथकाने नदी प्रवाहात अवैधरित्या पाणी अडविणे, अवैधरित्या पाणी उपसा करणार्‍यांवर कार्यवाही करावी. पाणीपट्टीची रक्कम कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांनी पाटबंधारे विभागास जमा करून घेवून त्यानंतरच पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.