नंदुरबार। शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील सिंचन प्रश्नी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना संघर्ष समितीचे निमंत्रक तथा पंचायत समितीचे सदस्य सतीश पाटील यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना.महाजन यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शंभर हुन अधिक गावांचा पाणी प्रश्न निकाली काढणार आणि सुमारे 7 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा सिंचन प्रश्न कमालीचा रखडला आहे.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्याकडे राजकीय नेत्यांनी देखील पाठ फिरवली आहे,राजकीय इच्छाशक्तीच्या अभावत सापडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना संघर्ष समितीचे निमंत्रक तथा शिंदखेडा पंचायत समितीचे सदस्य सतीश पाटील यांच्या नेतृत्वाने कंबर कसली आहे. या साठी आंदोलन, निवेदन आदी सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. त्याचाचा एक भाग म्हणून या समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
तापी बुराई या योजनेच्या कामाला गती देण्यासाठी निधी मिळवून द्यावा, ही योजना पूर्ण झाली तर नंदुरबार तालुक्यातील तसेच शिंदखेडा, साक्री तालुक्यातील शेकडो गावांचा पाणी प्रश कायम सुटणार आहे. त्याच प्रमाणे सुमारे 7 हजार हेक्टर शेत जमीन ओलीताखाली येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, म्हणून या योजनेचा पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत समावेश करावा, या मागणी बरोबरच शिंदखेडा तालुक्यातील महात्मा फुले उपसा सिंचन आणि गुरुदत्त उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणीही केली आहे. या योजना सुरू झाल्या तर 25 गावांचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे,अशी वस्तुस्थिती सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना पटवून दिली आहे. ना.गिरीश महाजन यांनी देखील गंभीरपणे दखल घेऊन जलसंपदा विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत.