पुणे : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील दंगलीची निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह पुण्यात आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसच्या कामगिरीचे प्रदर्शन भरविण्यात आले असून चतुर्वेदी यांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी संयोजक मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या, उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले प्रचार दौरे थांबवून राज्यातील कायदा – सुव्यवस्थेत लक्ष घातले पाहिजे. ही दंगल दुर्देवी असेच त्याचे वर्णन करावे लागेल. बिघडलेल्या परिस्थितीची जबाबदारी योगींना घ्यावीच लागेल.
मोदी सरकारच्या काळात बजरंग दल या सारख्या संघटना मुजोर झाल्या, अशी टीका चतुर्वेदी यांनी केली. विकास आणि गतिमान कारभार असे मुद्दे मांडून मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. त्यावेळी राममंदिर आदी मुद्दे मागे टाकले होते. विकास करण्यात अपयश आल्यावर राममंदिर अजेंड्यावर आणले. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. राफेल विमान खरेदी व्यवहारातील घोटाळ्याने भ्रष्टाचारविरोधाचा मोदींचा मुद्दा कुचकामी ठरला आहे, असे मत चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.
दर सहा महिन्यांच्या अंतराने शेतकरी महाराष्ट्रात आंदोलन करतात यात महाराष्ट्र सरकारचे अपयश दिसते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने रडविले अशी टीका त्यांनी केली .