बुलंदशहर- उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कथित गोहत्येच्या संशयावरून झालेल्या हिंसाचारप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक कृष्णा बहादूर सिंग यांची बदली करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जवान जितेंद्र मलिक यालाही काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कृष्णा बहादूर सिंग यांची पोलीस महासंचालक कार्यालयात बदली करण्यात आली आहे. सिंग यांच्या जागी सीतापूरचे पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांना नेमण्यात आले आहे.
सरकारने सत्यप्रकाश शर्मा आणि सुरेश कुमार या पोलिसांची आधीच बदली केली. अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. बी. शिराडकर यांनी शुक्रवारी हिंसाचारप्रकरणी अहवाल सादर केला. त्यानंतर या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या हिंसाचारप्रकरणी जितेंद्र मलिक ऊर्फ जितू फौजी याला ताब्यात घेण्यात आले. तो २२ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असून, उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक त्याला लवकरच ताब्यात घेणार असल्याचे समजते.