बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळग्रस्त घोषित करा ; खासदार रक्षा खडसे यांची मागणी

बुलडाणा पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मुक्ताईनगर : सुरूवातीला दुबार पेरणी करून सुद्धा नंतर जोरदार वादळी वारे व अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना, आजपावतो राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले गेले असून त्यांना दिलासा देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात यावे, अशी मागणी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी पत्राद्वारे बुलडाणा जिल्हा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी, बुलडाणा यांना केली आहे.

दुबार पेरणीनंतरही दिलासा नाहीच
रावेर लोकसभा मतदार संघातील नांदुरा व मलकापुर तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात हवामान अंदाज वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नव्हता. जून महिन्याच्या सुरवातीपासूनच परीसरातील शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी करून टाकली होती. जुलै महिना उजाडल्यावर अजून पावसाचे कुठल्याही प्रकारचे हवामान दिसत नव्हते. त्यामुळे पावसा अभावी नाईलाजास्तव शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केलेली होती. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले होते. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकर्‍यांनी बँकेतून कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिकांची लागवड केली होती परंतु जुलै महिन्याच्या अखेरीस तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या वादळ व अतिवृष्टीमुळे पावसाच्या आशेवर पुन्हा तडजोड व उसनवारीने दुबार पेरणी केलेल्या शेतकर्‍यांच्या हाती काहीही काहीही आलेले नाही. त्यातच राज्य सरकारकडून वादळाने व अतिवृष्टीने बाधीत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली गेलेली नाही, असेही खासदार रक्षा खडसे यांनी पत्रात नमूद केले आहे.

शेतकर्‍यांना दिलासा देण्याची अपेक्षा
वास्तव परीस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरात-लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी व बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळ ग्रस्त घोषित होण्यासाठी बुलडाणा जिल्हा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी आपल्या स्तरावरून तत्काळ योग्य ती दखल घ्यावी, अशी अपवेक्षा खासदार रक्षा यांनी केली आहे.