बुलढाण्याच्या ठेवीदाराची फसवणूक : चंद्रकांत बढेंसह संचालकांना सीआयडीकडून अटक

भल्या पहाटेच पथकाची वरणगावात छापेमारी : फसवणूक प्रकरणी कारवाई

भुसावळ : सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे यांच्यासह वरणगावातील सात संचालकांना बुलढाणा पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ठेवीदाराच्या फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेतील घोटाळ्यांबाबत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पतसंस्थेच्या पालघर, पुणे, सांगवी, सांगली या ठिकाणी असलेल्या शाखेसह इतर शाखेत अपहार झाल्याची नोंद यापूर्वीच करण्यात आली असून सहकार क्षेत्रातील मोठी संस्था डबघाईस आल्याने हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये त्यात अडकले आहेत.

पहाटे पाच वाजेच्या सुमारास छापेमारी
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक पितांबर तोताराम चौधरी (बुलढाणा) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दोन लाख 20 हजारांची मुदतठेव बढे पतसंस्थेत 2005 मध्ये केली होती व त्याची मुदत 2011 मध्ये संपल्यानंतर ठेवीदाराला रक्कम परत मिळणे अपेक्षित होते मात्र मुदतठेव व त्यावर मिळणारे व्याज मिळून सात लाख 13 हजार 836 रुपयांची रक्कम परत न मिळाल्याने चौधरी यांनी या प्रकरणी बुलढाणा पोलिसात 19 ऑक्टोबर 2013 रोजी गुन्हा दाखल केला होता व त्याचा तपास बुलढाणा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी बुलढाणा येथील सीआयडीच्या पथकाने वरणगाव शहरात बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास स्थानिक पोलिसांना सूचित करीत छापेमारीला सुरूवात केली. पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत हरी बढे यांच्यासह माजी नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलिधर पाटील, बळीराम केशव माळी, गोंविद ज्ञानेश्वर मांडवगने, भिंकू शंकर वंजारी, विजय वाघ या सात संचालकांना बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ताब्यात घेतल्यानंतर पथकाने त्यांना वाहनातून बुलढाणा येथे नेत रात्री अटक केली तर कारवाईच्या धास्तीने अन्य संचालक मात्र पसार झाले. त्यांचा शोध पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी शीतल मदने, पोलिस निरीक्षक शेळके, हवालदार मनोज नाफळे, प्रशांत गळवडे, कुळकर्णी पथकात अमरावती व वाशीम विभागाच्या पोलिस पदाधिकारी व कर्मचार्‍यांचा पथकात समावेश होता. दरम्यान, बढे पतसंस्थेच्या संचालकांना अटक झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे तर कोट्यवधींची ठेवी अडकून असलेल्या ठेवीदारांना मात्र ठेवी परत कधी मिळणार? याची आस लागली आहे.