बुलेटमधला कर्णकर्कश आवाज होणार बंद

0

हॉर्न विक्रेत्यांवर होणार कारवाई : वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची माहिती

पुणे : वाहन चालविताना वाहनांच्या सायलेंन्सर यंत्रणेत बदल करून फटाक्यासारखा आवाज काढला जातो. यामुळे कर्णकर्कश आवाज येऊन इतर वाहनचालकांना याचा त्रास सोसावा लागतो. अशा वाहनांमध्ये बुलेटचे प्रमाण जास्त असून यावर वाहतूक विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. मात्र, आता वाहतूक विभागाकडून अशा प्रकारचे हॉर्न विक्री करणार्‍यांनाचा टार्गेट करण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
मोटार वाहन कायद्यानुसार कर्कश हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. विशेषत: रुग्णालय, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कर्कश हॉर्न वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, डुक्कर हॉर्न, मल्टीसाऊंड हॉर्न अशाप्रकारचे हॉर्न वाजवित जाणार्‍या दुचाकीस्वारांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शहरातील प्रदूषणात वाढ होऊन बर्‍याचदा अपघात होण्याची शक्यता असते.

वक्रेत्याला बजावणार नोटीस

अनेकदा कर्कश हॉर्न वाजविणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई होते, मात्र हॉर्न उत्पादक आणि विक्रेते यापासून दूर राहतात. आता वाहतूक पोलिसांकडून अशा विक्रेत्यांचा शोध घेण्यात येणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या कारवाईमध्ये कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. कारवाईत वाहनचालकांकडून हॉर्न बसवून आणलेल्या ठिकाणाची माहिती घेण्यात येत आहे. यानंतर संबंधित विक्रेत्याला नोटीस देऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सातपूते यांनी सांगितले.

दंडात्मक कारवाई

तरुणांना बुलेट वापरणे जास्त आवडते. तसेच, बुलेटच्या फायरिंग यंत्रणेत बदल करून त्यातून फटाक्यासारखा आवाज निर्माण केला जातो. यासाठी काही गॅरेजचालक बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखा आवाज येईल, अशी सोय करतात. यामुळे तरुणांना इतरांचे लक्ष वेधण्यासाठी बुलेटमधून आवाज काढणे चांगले वाटते. अशा प्रकारच्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, आता त्यांच्या विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.