नवी दिल्ली – दिल्ली ते वाराणसी हे ७२० किलोमीटर अंतर दोन तास आणि ३७ मिनिटात कापणारी बुलेट ट्रेन आता दृष्टीपथात आली आहे. प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल रेल्वेकडे सादर झाला असून त्यावर उच्चस्तरीय बैठकही झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेली वाराणशी आणि देशाची राजधानी जोडणारा हा प्रकल्प भारतीय जनता पार्टीसाठी जिव्हाळ्याचा आहे. दिल्ली-लखनौ हे ४४० कि.मी अंतर या बुलेट ट्रेनमुळे केवळ एक तास ३८ मिनिटात कापता येणार आहे.
प्रति किलोमीटर साडेचार रुपये….
खरे तर दिल्ली- कलकत्ता अतिजलद कॉरिडोर प्रकल्पाचा दिल्ली-लखनौ मार्ग हा एक भाग आहे. स्पॅनिश फर्म इनेको टिप्सा आयसीटीने या प्रकल्पाचा व्यवहार्यता अध्ययन अहवाल (फिजिबिलीटी स्टडी रिपोर्ट) तयार करून रेल्वे मंडळाला आणि अतिवेगवान रेल्वे महामंडळाला गुरूवारी सादर केला. त्यात प्रति किलो मीटर साडेचार रुपये इतके भाडे प्रस्तावित केले आहे. दिल्ली ते वाराणसी ३२४० रुपये तर दिल्ली ते लखनौ १९८९ रुपये इतके प्रवास भाडे लागणार आहे.
अतिवेगवान प्रवासाचा तिसरा प्रकल्प…
देशभरात प्रस्तावित असलेल्या अतिवेगवान प्रवासासाठी प्रस्तावित प्रकल्पांपैकी हा तिसरा प्रकल्प आहे. त्यापैकी मुंबई ते अहमदाबाद कॉरिडोरचे काम सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. मुंबई-नागपूर प्रकल्पाला आता केवळ उच्चस्तरीय मान्यतेची प्रतिक्षा आहे. अहवालानुसार दिल्ली-लखनौ प्रकल्प २०२१ मध्ये सुरू होईल तर दिल्ली वाराणशी जलद पट्टा २०३१ पासून कार्यान्वित होईल, असे रिपोर्ट सांगतो.
प्रकल्प खर्च…
दिल्ली- वाराणसी पट्टा नोईडा, अलिगढ, लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर या विभागांमधून जाईल. दिल्लीतील अक्षरधाम मंदिराजवळ प्रकल्पाचे मुख्य टर्मिनल असेल. एक हजार ४७४ किमी दिल्ली कलकत्ता पट्ट्यासाठी एक लाख २१ कोटी खर्च तर वाराणशी पट्टयासाठी ५२ हजार ६८० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार अहवालावर मंडळाने चर्चा केली. जास्तीत वेग ३०० कि.मी प्रति तास इतका मिळण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे.