बुवा-बाबांची सद्दी संपली?

0

आपण भारतीय लोक मुळातच श्रद्धावान आहोत. आपण आपल्या कर्मावर नाही तर नशिबावर बहुतेक वेळा अवलंबून असतो. म्हणूनच आपली मानसिकता ही नेहमीच द्विधावस्थेत असते. त्याचाच नेमका फायदा उचलून हे बुवा-बाबा आपली तुंबडी भरून घेत असतात. गुरमीत रामरहिम सिंग याच्या अटकेनंतर देशातील अनेक बुवा आणि बाबांनी आपली दुकानं आवरती घेतली आहेत. आजच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत देशातील चौदा बुवा-बाई-बाबांची नावेच घोषित केली आहेत. हे सारे बोगस असून, त्यांच्यावर कोणत्याही भक्ताने, जनतेने विश्‍वास ठेवू नये असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या सगळ्यांमध्ये नेहमीप्रमाणेच आशूमल शिरमलानी म्हणजेच आसाराम बापू, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, सच्चिदानंद गिरी ऊर्फ सचिन दत्ता, गुरमीत सिंग सच्चा डेरा सिरसा, ओम बाबा, निर्मल बाबा, इच्छाधारी भीमानंद, असीमानंद, ओम नमः शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, आचार्य कुशमुनी, बृहस्पती गिरी, मलखान सिंह अशा चौदा जणांना भामटे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे सगळे साधू संत बोगस, बिनकामी, जनतेला लुटणारे, लुच्चे, लबाड असल्याचेच जाहीर झाल्याने त्यांच्या असंख्य अंध भक्तांवर डोंगर कोसळल्यासारखे झाले आहे.

महाराष्ट्रात नरेंद्र महाराज नावाचे बाबा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात नाणीज येथे त्यांचा मठही आहे. या बाबांची पार्श्‍वभूमी अशी की ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून नोकरीला होते. या नोकरीत असताना त्यांनी आर्थिक घोटाळा केल्यामुळे सरकारने निलंबित केले. नंतर यांनी बाबागिरी सुरू केली. दरपोर्णिमेला या बाबांकडे मुंबईतून भरभरून गाड्या जात असत. हे बाबा सुरुवातीला स्वतःला गजानन महाराजांचे अवतार म्हणवत असत. काही दिवसांनंतर ते स्वयंभू बाबा बनले. त्यांच्याकडे होणारी गर्दी पाहून शिवसेनाही या बाबांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबांना उघडे पाडल्यानंतर या बाबांचे प्रस्थ हळूहळू कमी झाले. आता वेळ मिळेल तसे अंदाज घेऊन हे बाबा मेळावे भरवतात. परंतु, पूर्वीसारखी गर्दी या मेळाव्यांना होत नाही. हे पाहून आता त्यांचे मेळावेही कमी भरवले जात आहेत. या बाबांनी काय चमत्कार केले हे त्यांच्या भक्तजणांनाच माहीत. नरेंद्र महाराजांना मात्र या भोंदूबाबांच्या यादीतून वगळलेले आहे.

म्हणूनच आपल्या गुरूची भक्ती ही मार्केटिंगच्या दृष्टीने त्यांच्या काही फायद्याची ठरणारी नाही, हेही अशा अंध भक्तांना जाणवल्याशिवाय राहिले नसेल. काही असो, इलाहाबाद येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेने जाहीर केल्यानंतर तरी देशातील अशा भक्तगणांना सुधारण्याची संधी मिळाली आहे. कारण हे बाबा, बाई, बुवा काही सुधारण्याच्या लायकीचे उरलेले नाहीत. ते या भक्तांच्या मानसिकतेचा फायदा उचलून त्यांना उल्लू बनवतात आणि त्यांचेच शोषण करतात. रामरहिम हा किती बनेल होता, हे त्याच्या डेर्‍यातून मिळालेल्या संपत्तीतून आणि मानवी सांगड्यावरून सिद्ध झालेच आहे. त्याच्या डेर्‍यातून दंगलीसाठीदेखील कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला होता, हेही आता कळते आहे. त्याच्या डेर्‍यातील निवासस्थानापासून निघालेली एक गुहादेखील पोलिसांना सापडली असून ती थेट साध्वी निवासापर्यंत निघत असल्याचे दिसले. ही गुहा म्हणजे भुयारच आहे. या रामरहिमला आपल्या निवासस्थानातून साध्वी निवासापर्यंत जाण्यासाठी गुप्तपणे, लपूनछपून जाण्यामागचे कारण तर आता उघडच झाले आहे. वीस वर्षांनंतर जेव्हा हा रामरहिम तुरुंगातून बाहेर येईल तेव्हा त्याला त्याच भुयारात कायमचा गाडला पाहिजे. त्याच्या डेर्‍यात चिखलाने भरलेला एक दुसरा फायबरचा बोगदा सापडला, एक बेकायदा फटाक्यांचा कारखाना सापडला, रसायनं मिळाली, एके 47 साठी लागणारी काडतुसे मिळाली, नावे नसणारी औषधं मिळाली, नंबर नसलेल्या आलिशान गाड्या, प्लास्टिक चलन, दोन खोल्या भरून रोकड रक्कम, … ही आकडेवारी सोशल मीडियावरून रोज वाचायला मिळते. अशा या श्रीमंत बाबाला काय कमी होते म्हणून त्याने नको त्या उचापती केल्या, असा प्रश्‍न पडतो. वास्तविक जेव्हा त्याच्या डेर्‍यात बलात्काराच्या घटना घडल्या त्याचवेळी हे प्रताप उघड झाले असते, तर हा रामरहिम आज फासावर लटकला असता. काही असले तरी आता त्याच्या दरार्‍याखाली राहणार्‍या भक्तांना अभय मिळाले आहे. यापुढे अशा कोणत्याही स्वार्थी बाबाच्या नादाला लागण्याचा मूर्खपणा कोणी करणार नाही, हे नक्की झाले. देशात आजमितीस गल्लीबोळात अनेक बुवा-बाबांचे प्रस्थ आहे. अनेकजण या मंडळींच्या नादी लागले आहेत. यामागील कारण आधीच म्हटलं त्याप्रमाणे मानसिकता हे आहे. कारण, सर्वसुखी असा कोणी नाही. प्रत्येकाला आरोग्य, ऐश्‍वर्य, सुख, समाधान, प्रतिष्ठा, शाश्‍वती, भविष्य याबाबत अधिकाधिक काही पाहिजे असतं. पैसा हा तर या सर्व गोष्टींचा माध्यम आहे. त्यात आध्यात्मिक शांती हवी असते, प्रश्‍नांची उत्तरं हवी असतात. त्यांना आपल्याच प्रश्‍नावर आपणच तोडगा काढलेला रुचत नाही. कित्येकांना साध्यासोप्या समस्यापूर्तीचीही जाण नसते. त्यांना आपलंसं करणारा, त्यांच्या तोंडावर त्यांच्या दुःखाचं भांडवल करणारा, त्यातून त्यांना मार्ग दाखवणारा, जादूई करामती दाखवून, बोलबच्चन करून रिझवणारा आणि आपल्या मागे लावून घेणारा कोणीतरी त्राता हवा असतो. त्या दुःखितांचा स्वतःवर, स्वतःच्या कष्टावर विश्‍वास नसतो. त्यांच्या आजारपणावर भोंदूबाबाचा चमत्कार हाच उपाय महत्त्वाचा वाटत असतो. अशा परिस्थितीत अशा बाबा, बुवांचे चांगलेच फावते. त्याचीच निष्पत्ती म्हणजे देशात वाढलेले बाबा बुवांचे प्रस्थ होय. आज अखिल भारतीय आखाडा परिषदेने चौदा भामट्या बाबा, बुवा, संत, बाई आणि स्वतःला गुरू समजणार्‍या अशा धेंडांची नावे जाहीर करून एक मोठे चांगले काम केले आहे. आता तरी या देशातून अशा भामट्यांची सद्दी संपेल, अशी आशा बाळगू या!.