बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीतील सामने ठरले चुरशीचे

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या पश्‍चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या शुक्रवारी चौथ्या दिवशी उशिरापर्यंत बाद फेरीतील सामन्यांमध्ये चुरशीची लढत सुरु होती. आज सकाळी साखळी सामने झाल्यानंतर दुपारी अंतिम सामने होऊन स्पर्धेचा समारोप होणार आहे. पुरुषांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांनी तर महिलांमध्ये एका विद्यापीठाने साखळी फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पुरुष संघही साखळी फेरीसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेचा समारोप होण्या अगोदर साखळी सामने होतील.

गुरुवारी विजेत्या ठरलेल्यांचा गौरव
साखळी फेरीसाठी महिलांमध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठ सुरत, महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा आणि राजस्थान विद्यापीठ जयपूर हे चार संघ पात्र ठरले आहेत. तर पुरुषांमध्ये जयपूर, नागपूर, कोल्हापूर आणि उमवी या चार संघांनी साखळी फेरी गाठली आहे. गुरुवारच्या सामन्यात पुरुषांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा खेळाडू प्रणव पाटील तर महिलांमध्ये वीर नर्मद दक्षिण विद्यापीठ, सुरतची अंजली रावत हे त्या दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू ठरले. इंडियन ऑईल या कंपनीने स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, अधिसभा सदस्य प्रा.संजय सोनवणे, प्रा.संध्या सोनवणे, प्रा.अनिल पाटील, प्रा.किशोर कोल्हे यांनी शुक्रवारी भेट दिली.