मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी कारवाई
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी पाच वाजल्यापासून लागल्याने महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. राजकीय पक्षांचे फ्लेक्स, बॅनर, झेंडे काढण्याला सुरूवात केली असून, स्थायी स्वरूपात लावलेल्या बोर्डांवरही स्टिकरिंग करण्याला सोमवारपासून सुरूवात केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. संपूर्ण देशभरात चार टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असून, पुण्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी त्यांच्याशी संबंधित जाहिररित्या लावण्यात आलेल्या गोष्टींवर महापालिकेने कारवाई करण्याला सुरूवात केली आहे.
15 क्षेत्रीय कार्यालयांना आदेश
महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागातर्फे ही कारवाई करण्यात येते. विभागाने 15 क्षेत्रीय कार्यालयांना या संदर्भात आदेश दिले असून, क्षेत्रीय कार्यालयांनी या कामासाठी दोन-तीन पथके नेमली आहेत. या पथकांकडून ही कारवाई केली जात आहे. तात्पुरत्या स्वरूपात लावलेले फ्लेक्स, बॅनर काढून टाकले जाणार आहेत, तर अन्य स्थायी स्वरूपातील स्ट्रक्चर किंवा बोर्ड स्टीकरच्या सहाय्याने झाकून टाकले जाणार आहेत. स्वच्छ भारत सर्व्हेक्षणांतर्गत रंगवलेल्या भिंतींवर माननीयांनी स्वत:ची नावे संकल्पने’च्या माध्यमातून लिहिली आहेत. ती नावे ज्या रंगांनी काढली आहेत त्याच रंगांचा वापर हे घालवण्यासाठी केला जाणार आहे. यामुळे जे काही पेन्टींग आणि सुशोभिकरण केले आहे, ते विद्रुप होऊ नये हा यामागचा उद्देश्य असल्याचे आकाशचिन्ह परवाना विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी सांगितले.