बेंगळूरू बीस्टला पराभूत करून मुंबई विजयी

0

पणजी । यूबीए प्रो- बास्केटबॉल लीगमध्ये मुंबई चॅलेंजर्स संघाने बेंगळूरु बीस्ट संघावर 110-95 असा विजय मिळविला. मुंबई चॅलेंजर्स संघाच्या अ‍ॅलेक्स स्केल्स आणि जिमी स्क्रोगिन्स यांच्या दमदार खेळाच्या जोरावर विजेतेपदाचा पाया रचला.चौथ्या हंगामातील पहिल्या अंतिम फेरीत मुंबईने जोरदार आक्रमणाच्या जोरावर बेंगळूरुच्या संघाला हताश केले. याला प्रतित्तर देत तिसर्‍या व चौथ्या सत्रांत बेगळूरूने मुबई संघावर जोरदार हल्ले केले मात्र प्रयत्न करून ही त्यांचा विजय साधता आला नाही.या लढतीत मुंबईकडून अ‍ॅलेक्सने सर्वाधिक 34, तर जिमीने 32 गुणांची कमाई केली, तर बेंगळूरुकडून ख्रिस सोलोमनने 28 गुण मिळवले.

पहिल्या सत्रात मुंबईने अ‍ॅलेक्स (15) आणि जिमी (10) यांच्या आक्रमणाच्या जोरावर 29-19 अशी आघाडी घेतली होती. दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला अ‍ॅलेक्स आणि जिमी यांनी जलद खेळ करत संघाची गुणसंख्या झपाटयाने वाढवली. त्यामुळे या सत्राच्या उत्तरार्धात त्यांना विश्रांती देण्यात आली; पण याचा फायदा बेंगळूरुला उचलता आला नाही. दुसर्‍या सत्रात मुंबईने 29 गुणांची भर घालत 58-36 अशी आघाडी घेतली. तिसर्‍या सत्रात बेंगळूरुच्या विशेष भ्रिगुवंशीने जोरदार आक्रमण केले. त्याच्या आक्रमणाला संघ सहकार्‍यांनी सुरेख साथ दिली. दुसरीकडे बेंगळूरुने या सत्रात चांगला बचावही केला. त्यामुळे तिसर्‍या सत्रात बेंगळूरुच्या संघाने 24 गुणांची कमाई केली, पण मुंबईने या सत्रात 31 गुणांची कमाई करत 89-60 अशा फरकाने आघाडी मात्र कायम ठेवली. चौथ्या सत्राच्या पहिल्या दीड मिनिटांमध्ये जोरदार आक्रमण करत बेंगळूरुने आठ गुणांची कमाई केली. या सत्रात बेंगळूरुच्या आक्रमणाला चांगलीच धार आली होती.

एका बाजूने विशेष आणि दुसर्‍या बाजूने ख्रिस यांनी मुंबईच्या संघावर जोरदार हल्ले चढवले. हे त्यांचे डावपेच लक्षात घेत मुंबईने विशेषचे आक्रमण बोथट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यशही आले. चौथ्या सत्राला सहा मिनिटे शिल्लक असताना जिमीने मुंबईला दोन गुण मिळवून देत संघाचे शतक पूर्ण केले. दुसर्‍या बाजूने बेंगळूरुही चांगले आक्रमण करत होती, पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या हातून काही चुका घडल्या आणि त्याच त्यांना महागात पडल्या.