मुंबई । मानखुर्द-मंडाला येथील गोदामाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील अशा अनधिकृत गोदामांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगीला कारणीभूत ठरणारी गोदामे आता पालिकेच्या रडारवर असून, अशी अनधिकृत गोदामे जमीनदोस्त केली जाणार आहे. कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेनंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू केला. या कारवाईत अनेक ठिकाणी अग्निसुरक्षेचा नियम धाब्यावर बसवल्याचे प्रकार उघडकीस आलेे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. वसाहती जवळपास बेकायदा बांधकामे करून त्यात भंगाराची गोदामे उभी राहिली आहेत. या गोदामात विविध प्रकारच्या भंगारांचा साठा करण्यात येतो.
मानखुर्द आगीला बेकायदा गोदाम कारणीभूत
या गोदामाच्या ठिकाणी प्लास्टिक ड्रम, पॅकिंग सामग्री, स्टॉकचा साठा, बिस्लेरी बाटल्या, विद्युत वायरिंग, प्लायवूड, लाकडी फर्निचर, स्क्रॅप वायरिंग, रसायनांचा साठा, लाकडी आणि जीआय शीटस, चिंध्या, सुमारे 50-60 गॅलन्स आदीचा साठा करून ठेवल्याचे समोर आले. येथे ज्वलनशील पदार्थांचा साठा तसेच अनधिकृत बांधकाम व वीज जोडणी पुरवठाही बेकायदेशीर केला जात होता. याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, अशा प्रकारची भंगारची अनधिकृत गोदामे मुंबईत बहुतांशी ठिकाणी उभी आहेत. मानखुर्दला यापूर्वीही याच परिसरात अग्नितांडव झाले होते. मात्र पालिकेने ठोस कारवाई केली नसल्याने असे अनधिकृत व्यवसाय उभे राहत असल्याच्या प्रतिक्रिया येथील रहिवाशांच्या आहेत.
कुर्ला, वांद्रे, धारावी परिसरावर लक्ष!
मुंबईत वसाहती जवळपास अशी अनधिकृतपणे गोदामे उभारण्यात आली आहेत. विशेषत: कुर्ला, वांद्रे, धारावी, रे रोड, अंधेरी आदी ठिकाणी गोदामे अनधिकृतपणे उभी आहेत. काही महिन्यांपूर्वी रे रोड येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागून त्यात गोदाम जळून खाक झाले होते, अशी गोदामे उभी करून त्यात ज्वलनशील पदार्थांचा साठा केला जात असल्याने थोडी ठिणगी पडली तरी आगीचा वणवा पसरतो. पालिकेने आता अशा भंगारांच्या गोदामांकडे लक्ष वेधले असून, लवकरच या अनधिकृत गोदामांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली.