विनापरवाना मांडव, कमानींसाठी रस्त्यावर खड्डे खोदणार्या मंडळांवर कारवाई
पुणे । गणेशोत्सवासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून अनेक गणेश मंडळांकडून मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, परवाने न घेता बेकायदेशीरपणे रस्त्यावर खड्डे खोदून मांडव, कमानी टाकणार्या मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विनापरवाना मांडव, कमानींसाठी रस्त्यावर खड्डे खोदणार्या मंडळांची पाहणी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने बुधवारी दिला असून आतापर्यंत बेकायदा मांडव उभारलेल्या 140 मंडळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे अवघ्या एका क्लिकवर गणेशोत्सव मांडव आणि कमानींचे परवाने ऑनलाइन घेण्याची सुविधा सार्वजनिक गणेश मंडळांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे एक हजार 750 मंडळांनी पोलिसांकडे ऑनलाइन अर्ज केले असून त्यांपैकी सुमारे 650 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
महापालिकेने 350 मंडळांना परवानगी दिली असून त्यानुसार मंडळांनी मांडव आणि कमानी उभारण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, काही मंडळांनी बेकायदेशीरपणे मांडव आणि कमानी उभारल्या असून त्यासाठी खड्डे घेतल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात पाहणी करून बेकायदेशीरपणे मांडव, कमानी उभारणारे व त्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदणार्या गणेश मंडळांना नोटिसा बजावण्याची सूचना महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांनी प्रशासनास केली आहे.
या पाहणीचा अहवाल राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय उत्सवादरम्यान रस्त्यांवरील बेकायदा ठेले, हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.