नवी दिल्ली । केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणार्या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवण्याचे आवाहन केले आहे. गाड्यांचे फोटो पाठवणार्यांना बक्षिसही दिले जाईल असे नितीन गडकरींनी सांगितले आहे. वाहनचालकाला जो 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, त्यातील 10 टक्के रक्कम माहिती पुरवणार्या व्यक्तीला देण्यात येणार आहे. ’आपल्या मंत्रालयाबाहेर नसलेल्या पार्किंग लॉटमुळे अॅम्बेसिडर गाड्या आणि प्रतिष्ठित लोकांना संसदेच्या मार्गावरच पार्किंग करावे लागते, ज्यामुळे संसदेकडे येणार्या रस्त्यावर कोंडी होते. हे फारच लाजिरवाणे असल्याचे’, नितीन गडकरी यावेळी बोलले आहेत.
नेमके काय म्हणाले नितीन गडकरी
मोटर वाहन कायद्यात मी एक तरतूद करणार आहे. रस्त्यावर असलेल्या कारचे फोटो तुमच्या मोबाइल फोनवर घ्या आणि संबंधित विभागाला किंवा पोलिसांना पाठवा असे आवाहन त्यातून करणार आहे. बेकायदेशीर पार्किंगसाठी 500 रुपयांचा दंड असून, त्यातील 10 टक्के रक्कम गाडीची माहिती पाठवणार्याला देण्यात येईल, पार्किंगला जागाच शिल्लक नसल्याने लोक त्यासाठी रस्त्यांचा वापर करत आहेत. किमान मोठ्या संस्थांमध्ये तरी पार्किंगची सुविधा असली पाहिजे, असे गडकरींनी सांगितले.
मलाही नेहमी पार्किंगचा प्रश्न भेडसावतो
1 प्रत्येक दिवस माझ्यासाठी लाजिरवाणा असतो. अॅम्बेसिडर गाड्या येत असतात. मोठे लोक येत असतात. संसदेसमोर संपुर्ण रस्ता ब्लॉक होतो. आणि पार्किंगची जागा बांधण्यासाठी मला 13 परवानग्यांची गरज होती.
2 फक्त सिंगल पार्किंग लॉट बांधण्याची परवानगी मिळण्यासाठी मला अनेक महिने लागले. मी हा मुद्दा शहरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांच्याकडे उपस्थित केला आहे’, अशी माहिती गडकरींनी दिली.