जळगाव : जिल्ह्यात लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर गुरांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली असतांनाही गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती जळगाव तालुका पोलिसांना मिळताच खोटेनगर बसस्टॉप परीसरातून गुरांची वाहतूक करणार्या वाहनावर तालुका पोलिसांनी कारवाई केली. वाहन जप्त करीत पोलिसांनी दोन बैलांची सुटका केली तसेच चालकाविरोधात गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कारवाईने उडाली खळबळ
जळगाव तालुका पोलिसांनी खोटेनगर बसस्टॉप येथे ये-जा करणार्या वाहनांची तपासणी केली असता एका वाहनात दोन बैल निर्दयीपणे कोंबलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी वाहन तसेच दोन्ही बैल जप्त केले. याप्रकरणी पोलिस नाईक प्रकाश चिंचोरे यांच्या फिर्यादीवरुन गुरांची वाहतूक करणार्या (एम.एच. 03 ए.एच. 3815) या वाहनावरील चालक जाफर अली अफजल अली सय्यद (24, रा.पिंपळकोठा बुद्रूक, ता.एरंडोल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड हे करीत आहेत.