पिंपरी-चिंचवड : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्या दोन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवार (दि. 23) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रेमलोक पार्क येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न या प्रकारचे गुन्हे आहेत. या गंभीर गुन्ह्यात ते फरार होते. दिनेश पुखराज रेणवा (वय 21, रा. मोरेवस्ती, साने चौक, चिखली) आणि अक्षय प्रभाकर साबळे (वय 23, रा. शितळादेवी चौक, आकुर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अंगझडतीत सापडले पिस्तूल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री गस्त सुरू असताना तपास पथकातील पोलिस नाईक जयवंत राऊत यांना दोन जण प्रेमलोक पार्क येथे उभे असल्याची माहिती मिळाली. हे दोघे जण काहीतरी विक्री करण्यासाठी आले असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता दिनेश रेणवा याच्याजवळ एक गावठी बनावटी पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आले. तर अक्षय साबळे याच्याकडे असलेल्या कॅरीबॅगमध्ये एक लोखंडी गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले.
दोघांकडून मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या दोघांकडून एक लाख 20 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एक महिन्यापूर्वी वाल्हेकरवाडीमध्ये तरुणाला बेदम मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. तर अशाच प्रकारची आणखी एक घटना वाल्हेकरवाडी येथे घडली होती. चौकशी दरम्यान, हे दोन्ही गुन्हे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अक्षय साबळे हा सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर निगडी पोलिस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.