बेघर कुटूंबियांचे दुसर्‍या दिवशीही उपोषण कायम

0

पुर्नवसनासाठी शासकीय जागेची मागणी ; प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले लक्ष

भुसावळ- रेल्वे परीसरातील अतिक्रमीत झोपडपट्टीधारकांच्या घरांवर रेल्वे प्रशासनाने हातोडा टाकल्याने बेघर झालेल्या कुटूंबियांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे तर दुपारी चार वाजेदरम्यान युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनी धाव घेवून या युवकास ताब्यात घेतल्याने अप्रिय घटना टळली.

निर्णयाविना उपोषण मागे न घेण्याचा निर्धार
रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या कुटूंबियांच्या पुर्नवसनासाठी प्रशासनाने सरकारी भुखंडामध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून निर्णयाविना उपोषण मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान चाळीस बंगला भागातील रहिवासी संतोष लक्ष्मण सावळे (वय 37) याने अचानक प्रवेश करूनन अंगावर रॉकेलची कॅन ओतली. यामुळे उपोषणस्थळी गोंधळ झाला. ही माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेवून सावळे यांना ताब्यात घेतले. बेघर कुटूंबियांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी या मागणी करावी, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास सामुहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. शुभम सोयंके, उमेश चाबुकस्वार, संदीप सपकाळे, गणेश सपकाळे, विशाल सपकाळे, मथुरा पवार, सारीका भालेराव, विक्की मेश्राम, विश्वास पवार, इम्रान खान आदींसह बेघर नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहेत.

प्रांताधिकार्‍यांनी दिली भेट
प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी सायंकाळी उपोषणार्थींची भेट घेतली. नगरपालिका, रेल्वे, महसूल आदींच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून भुखंडाचा प्रश्न निकाली लावू, असे आश्वासन त्यांनी दिले मात्र उपोषणकर्त्यांनी ठोस निर्णयाविना उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.