बेटावद खुर्दच्या पुल बांधकामात माती मिश्रीत रेती

0

बोदवड। जामनेर सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत बाडीकिल्ला ते जमिठा रस्त्यादरम्यान बेटावद खुर्द गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी काँक्रिटीमध्ये मातीमिश्रीत रेतीचा वापर होत आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष आहे.

तांबडी माती मिश्रीत रेतीचा केला वापर
बेटावद खुर्द गावाजवळ जामनेर उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभागाने जुनी दगडी फरशी काढून तेथे नवीन छोटा पुल बांधणीचे काम ठेकेदाराकडून सुरु आहे. परंतु या कामावर गिरणाची रेती न वापरता जंगलातील डोंगराळ नाल्यातून जमा केलेली तांबडी माती मिश्रीत रेतीचा वापर केला जात असून याठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कोणताही कर्मचारी हजर नाही. ठेकेदार आपल्या मनमानी पध्दतीने छोट्या पुलाच्या काँक्रिटीमध्ये मातीमिश्रीत रेतीचा वापर करीत आहे.

नागरिकांनी केली तपासणीची मागणी
या रेतीमुळे पुलाचे आयुष्य वाढण्याऐवजी कमी दिवसात पुल कोसळू शकतो. या मातीमिश्रीत रेतीमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाशेजारी टाकलेली मातीमिश्रीत रेतीला उपविभागीय अभियंता, संशोधन अधिकारी, क्षेत्रीय प्रयोग शाळा जळगाव यांनी मातीमिश्रीत रेतीचे परिक्षण करुन बांधकामाच्या साहित्याची चाचणी करुन परवानगी दिली आहे का? या कामाच्या रेतीची चौकशी करावी, अशी बेटावद खुर्दच्या सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे.