तळोदा:कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामूळे खासगी क्षेत्रातील सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे अनेक मंजुराच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामूळे तालुक्यातील मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (नरेगा) हमी योजनेच्या माध्यामातून जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर खांदे यांनी दिली.
पंचायत समिती सभागृहात उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर खांदे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार पंकज लोखंडे गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.बी. सोनवणे, वनक्षेत्रपाल निलेश रोडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सचिन काळे यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. खांदे पुढे बोलताना म्हणाले की, शासनाने ठरवून दिल्यानुसार कृषी विभाग, महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पूरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लघु सिंचन विभाग यासर्व विभागानी एकमेकांशी समनव्य साधून मजुरांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. सध्या 3020 मजूर आज पावेतो कामावर उपस्थित आहेत. 6 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करावे असेही ते यावेळी म्हणाले.
बैठकीत त्यांनी रोजगार हमी योजनावर सद्या स्थितीत सुरु असलेली कामे व अपुर्ण कामे व जिओ टॅगींगबाबत माहिती जाणून घेतली. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायती मार्फत गाळ काढणे, विहिर पुर्नभरणाचे काम करण्याच्या सूचनाही खांदे यांनी दिल्या.
*सध्या सुरू असलेले कामे व मजूर संख्या*
वनविभागा मार्फत सार्वजनिक 22 कामे सुरू असून 234 मजूर कामावर प्रत्यक्ष उपस्थित आहेत.
सामाजिक वनीकरण मार्फत 3 ठिकाणी कामे सुरू असुन 33 मजूर प्रत्यक्ष कामावर उपस्थित आहेत.
तालुका कृषी विभागा मार्फत वयक्तिक 18 कामे सुरू असून 60 मजूर कामे करीत आहे. तर सार्वजनिक 37 कामे सुरू असून 265 मजूराना कामे मिळाली आहेत.
पंचायत समिती मार्फत व्यक्तीक 1011 कामे सुरू असून 2216 मजुरांना कामे मिळाले आहे तर 12 सार्वजनिक कामे सुरू असून 1023 मजुरांना कामे मिळाले आहेत.
पंचायत समिती मार्फत 2448 मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे तर इतर विभाग मिळून केवळ 532 जणांना कामे देवु शकला आहे. म्हणजेच 50 टक्यापेक्षा अधिक कामे हे केवळ पंचायत समिती मार्फत होत आहे. इतर विभागांनी देखील कामे वाढवणे गरजेचे आहे.