बेरोजगारांसाठी मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन

1

जळगाव । सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना शासनाच्या ध्येय धोरणानुसार रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या संकल्पनेतून केंद्रशासनाने 8 एप्रिल 2015 रोजी मुद्रा बँक योजना कार्यान्वीत केली. या योजनेची अधिकाधिक अंमलबजावणी व्हावी या उद्देशान जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमवारी 27 रोजी मुद्रा लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकारमंत्री गुलाबराव पाटील असणार आहे. यावेळी महापौर नितीन लढ्ढ जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदू पटेल, नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ आदी उपस्थित राहणार आहेत. विविध बँका, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, महिला बचत गट आदींचे स्टॉल्स यावेळी लावण्यात येणार आहे. माहिती व अर्थसहाय्यासाठीचे अर्ज करण्याची प्रक्रियेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ई-पेमेंट सुविधांचे मार्गदर्शन, बँक खाते उघडण्याची सुविधा आदींबाबत मार्गदर्शन करणार आहे. बेरोजगार युवा-युवतींना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.