दुरुस्ती प्रगती पथावर : ऊस वाहतूक व तोडणी ठेकेदारांना चार कोटींचे वाटप
चाळीसगाव- राज्यात आदर्श ठरलेल्या आपल्याच परीसरातील बंद पडलेला साखर कारखाना भूमीपुत्रांच्या आर्थिक बळावर विकत घेऊन त्याचे पुनर्जीवन करणार्या अंबाजी ग्रुपने शुक्रवारी ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांना येत्या गळीत हंगामासाठी आगाऊ रक्कमेचे धनादेश दिले. यामुळे बेलगंगा साखर कारखाना दिवाळीच्या वेळी सुरू होण्यास कुठलीच अडचण राहिली नाही परीणामी जनमानसात कारखाना सुरू होण्याबाबत बाबतच्या उलट-सुलट चर्चांना पूर्ण विराम मिळणार आहे.
आगावू रकमेमुळे ऊस पुरवठा सुरळीत होणार -चित्रसेन पाटील
शुक्रवारी बेलगंगा कारखाना कार्यस्थळावर चेअरमन चित्रसेन पाटील, उद्योजक प्रविणभाई पटेल व अंबाजी टीमचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविकात जनरल मॅनेजर एन.एन.पाटील यांनी कारखाना दुरुस्ती प्रगतीपथावर असून ऊस तोडणी व वाहतूकदार ठेकेदारांना आगाऊ रक्कमेचे वाटप करण्यात आल्याने कारखाना सुरू होईल किंवा नाही या सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळेल. याप्रसंगी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कारखाना चालविताना उसाची दररोज तीन हजार टन उसाची आवश्यकता भासणार आहे. ती पुरविण्यात मुख्य भूमिका असणार्या ऊस तोडणी व वाहतूकदार घटकांची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यांना धनादेश दिल्याने ऊस पुरवठा वेळेत होईल त्यामुळे कारखाना दिवाळीच्या आसपास सुरू होणार आहे. आजवर कारखाना सुरू होण्याअगोदर पैसे जमा करण्याचा पहिला टप्पा, कारखाना देखभाल दुरुस्ती करणे हा दुसरा टप्पा सुखरूप पार पडला आहे तर कारखान्याकरीता ऊस उपलब्ध करून देणार्या ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार यांचा शेवटचा व महत्वाचा तिसरा टप्पा आज पूर्ण होत आहे त्यामुळे आज दीडशे पेक्षा अधिक ऊस तोडणी व वाहतूकदारांना चार कोटी रुपयांचा आगाऊ धनादेश देऊन त्यांची पुढील हंगामाकरीता बांधणी केली आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये कारखाना सुरू होणारच हा विश्वास बळावणार आहे.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी चित्रसेन पाटील, उद्योजक प्रवीणभाई पटेल, उद्धवराव महाजन, दिलीप चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, माजी पंचायत समितीचे सदस्य रवींद्र केदारसींग पाटील, किरण देशमुख, अजय शुक्ल, शरद मोराणकार, निशांतशेठ मोमाया, अशोक ब्राह्मणकार, विजय अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष विनायक वाघ, निलेश निकम, एकनाथ चौधरी, डॉ.अभिजीत पाटील, राजू धामणे, दिनेशभाई पटेल, श्रीरामजी गुप्ता, माणकचंद लोढा, विकिभाई पटेल, निलेश वाणी, डॉ.मुकुंद करंबळेकर, अर्जुन शिंदे, अशोक मेमाणे, बी.आर.पाटील, एस.के.भाकरे, शेतकरी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी कारखाना परीरसरात एक्साईज इन्स्पेक्टर व्ही.एम.माळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच कार्यालयातील संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.