अंबाजी टीमचे सोशल मीडियावर उत्स्फूर्त स्वागत : चौघांच्या खांद्यावर कारखान्याची धुरा यशस्वी होणार : चित्रसेन पाटील
चाळीसगाव- चार लाख मेट्रिक टन उसाच्या गाळप क्षमता असणार्या बेलगंगा साखर कारख्यान्याच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून शुक्रवारी गव्हाणीची यशस्वी ट्रायल घेतली गेल्याने अंबाजी टीम सुखावली असून सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्याने तालुक्यात उभ्या साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
यशस्वी ट्रायल मुळे शेतकर्यांमध्ये उत्साह
मी यापूर्वी ही चेअरमन म्हणून काम केले आहे मात्र आता कमी वेळात कारखाना दुरुस्त करून उसाचे गाळप ऑक्टोंबरमध्ये व्हावे हे आव्हानात्मक काम होते यासाठी अनुभवी तंत्रज्ञ व अधिकारी नेमले असल्याने आम्ही कुठलाही हस्तक्षेप करीत नाही, असे माजी चेअरमन चित्रसेन पाटील म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव पाटील, चीफ इंजिनियर अर्जुन शिंदे, चीफ केमिस्ट अशोक मेमाणे, शेतकी अधिकारी सुभाष भाकरे अशा चार अनुभव संपन्न चौघांच्या खांद्यावर ही विकासाची धुरा दिली असून त्यांनी ती अतिशय चोख सांभाळली आहे त्यामुळे कितीही टोकाचा विरोध झाला तरीही कारखाना सुरू होईल, अशी खात्री मी यापूर्वी तालुकवासीयांना दिली आहे. शुक्रवारी गव्हाणीची यशस्वी ट्रायल झाल्याने मनस्वी आनंद झाला असून कारखान्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करता येणार असल्याची भावना अंबाजी ग्रुपचे सर्वेसर्वा तथा बेलगंगा कारखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना व्यक्त केली.
कारखाना रोलर पूजनंतर आता पुढचा टप्पा यशस्वी
गेल्या पंधरवाड्यात कारखाना कार्यस्थळावर अंबाजी ग्रुपच्या सर्व सदस्याच्या उपस्थित विधीवत रोलर पूजन करण्यात आले. याप्रसंगी अंबाजी ग्रुपचे प्रमुख चित्रसेन पाटील उद्योजक प्रवीणभाई पटेल, दिलीप चौधरी, प्रेमचंद खिवंसरा, किरण देशमुख, अजय शुक्ल, शरद मोराणकर, निशांतशेठ मोमाया, अशोक ब्राह्मणकार, विजय अग्रवाल, विनायक वाघ, निलेश निकम, एकनाथ चौधरी, उद्धवराव महाजन, वर्षा महाजन, डॉ.अभिजीत पाटील, राजू धामणे, दिनेशभाई पटेल, श्रीराम गुप्ता, माणकचंद लोढा, रवींद्र पाटील, निलेश वाणी, डॉ.मुकुंद करंबळेकर यांची उपस्थिती होती. शुक्रवारीज गव्हाणीची ट्रायल सुखरूप झाली यामुळे भूमिपूत्रांच्या माध्यमातून एक एक टप्पा पार केला जातो आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा घडत आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये कधी कारखान्याच्या चिमणीतून विकासाचा धूर निघेल याकडे लक्ष वेधले गेले आहे. तालुकावासीयांची बेलगंगा कारखान्याबाबत आकांक्षा वाढलेली असल्याने शुक्रवारच्या ट्रायलचे सोशल मीडियावर उत्स्फूर्त स्वागत होत आहे.