पुणे । पुणे शहरामध्ये एकूण 1298 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. शहराच्या सुरक्षिततेसाठी बसवलेल्या कॅमेरातून वाहतुकिला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. 29 मार्च 2017 पासून आजपर्यंत 4 लाख 50 हजार 475 वाहनचालकांनी ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन केले आहे. यामध्ये 47,336 वाहन चालकांनी कायदेशीर रित्या दंड भरले आहेत. तर, 4 लाख 3,139 वाहन चालकांनी दंड भरले नसून त्याच्यावर कायदेशीररित्या करवाईचे पत्र पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
वाहतुकीचे नियम मोडताच दुसर्याच मिनिटात गाडीचा फोटो व लोकेशन लिंकनुसार मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल. कायद्यानुसार वाहन चालकाकडून दंडात्मक रक्कम वसूल केली जाते. तसेच, जो वाहनचालक चारपेक्षा जास्त ट्रॅफिक सिग्नलच्या नियमाचे उल्लंघन करेल, त्यास कायदेशीर कारवाहीचे पत्र पाठवण्यात येईल, असा इशाराही पुणे शहर पोलिस वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे. शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेराच्या माध्यमातून शहराच्या सुरक्षेबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
घरपोच दंडाची पावती
पालिकेकडून प्रत्येक चौकात तसेच, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले, तरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका पुणे शहर पोलीस वाहतूक विभाग मोठ्या प्रमाणात पारपाडत आहे. कॅमेरामुळे नियमांचे उल्लंघन होणार्या वाहनाचे नंबर प्लेट टिपले जाणार आहेत. तत्काळ त्या वाहन चालकाचा पत्ता उपलब्ध होणार असून त्यांला घरपोच दंडाची पावती देखील पाठविली जाणार आहे.
मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याचे आवाहन
चोरीच्या वाहनावर लावलेल्या नंबर प्लेटमुळे अनेक निर्दोश नागरिकांना समस्या उद्भवत आहेत. अनेक नागरिकांना या करणामुळे वाहतुकीचे नियम व सिग्नल मोडल्याचा संदेश मोबाईलवर येत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांकडून पुणे शहर वाहतूक विभागाकडे तक्रारी येत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाकडून मोबाईल क्रमांक व पत्ता याची नोंद वाहतूक विभागात करण्यात यावी, असे आवाहन वाहन चालकांना करण्यात आले आहे.