दहा दिवसांत 295 जणांवर कारवाई; पीएमसी अॅक्टचा वापर
पुणे : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पीएमसी कायद्याचा आधार घेत कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून 295 बेशिस्तांना वाढीव दंड लावण्यात आला आहे. त्यांच्याकडून 4 लाख 12 हजार दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग, फुटपाथ, नो एंट्रीतून जाणार्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईत बदल केला आहे. अशा बेशिस्तांवर कारवाईसाठी मोटार वाहन कायद्याऐवजी महापालिका (पीएमसी) अॅक्टचा वापर केला जात आहे. पीएमसी कायद्यानुसार दुचाकीला पाचपटीने, तर चारचाकीला होणारा दंड दहापटीने वाढला आहे.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे ‘नो ट्रॅफिक रुल व्हायलोशन झोन’ तयार करण्यात आले असून नियमभंग करणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 19 तारखेपासून ही मोहीम तीव्र करण्यात आली असून कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणार्या 295 जणांवर पीएमसी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.