पुणे : प्रतिनिधी शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचे नियम मोडणार्या असंख्य वाहन चालकांना दंड वसुलीच्या पावत्या देण्यात आल्यात. परंतु, अद्याप तब्बल 18 कोटींचा दंड वसूल न झाल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मागील नऊ महिन्यात वाहतूक पोलिसांनी 6 लाख 57 हजार 978 वाहतूक नियमांतर्गत कारवाया केल्या. या कारवायांमधील थकीत दंड 17 कोटी 90 लाख 51 हजार 911 रूपय आहे. इतक्या मोठ्याप्रमाणात दंडाची रक्कम थकल्याने वाहतूक पोलिसांचीही झोप उडाली आहे.
नागरिकांना पुरेशी माहिती नाही
यासंदर्भात वाहतूक विभागाची पोलिस उपायुक्त अशोक मोरावळे यांनी सांगितले की, आम्ही थकीत दंड वसुलीसाठी काम करत आहोत. दंड भरणा करण्याच्या वोडाफोन केंद्रांची संख्या आम्ही 24 वरून 74 केली आहे. ज्यांचा दंड थकीत आहे अशा व्यक्तींना आम्ही नोटिसा पाठविल्या आहेत. सद्या दोन हजार जणांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. जर संबंधित व्यक्तीने नोटीस मिळूनही दंड भरण्यास उशीर केला तर अशा व्यक्तींवर न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल आणि त्यापुढे कायदेशीर कारवाई होईल, असे मोराळे यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष नियम तोडणार्या वाहन चालकांना सीसीटीव्हीद्वारे हेरून वाहन क्रमांकाच्या आधारे त्यास ई-चलान पाठवतो. हा दंड संबंधित वाहन चालकाला भरावा लागतो. मात्र, याबाबत अद्याप नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढले
मोराळे यांनी सांगितले की, वाहतुकीचे नियम मोडणार्यांना व दंड झालेल्या वाहन चालकांना आम्ही आतापर्यंत 5 हजार नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिसांना 80 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. काही नागरिकच नोटीस मिळाल्यानंतरही दंड भरण्यास उशीर करतात. मात्र, बहुतांश नागरिक नोटीस मिळताच दंड भरून मोकळे होतात. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे आम्ही एक कोटी रूपये दंडाची रक्कम गोळा केली आहे. पाचवेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकाला कायदेशीर नोटीस पठविली जाते तसेच त्याचे लायसन्सही रद्द केले जाते. शहरात सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन हे झोन 3 मध्ये होते. यामध्ये चिंचवड, पिंपरी, वाकड आणि हिंजवडी या परिसराचा समावेश आहे.
1230 सीसीटीव्हींचा वॉच!
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांना वाहतूक शाखेकडून ई-चलान एसएमएसद्वारे पाठविले जाते. हे ई-चलान बँकेचे कार्ड वापरून भरता येते. रस्त्यावर पोलिस आणि वाहतुकीचे नियम मोडणार्यांमध्ये होणारा रोख व्यवहार थांबविण्यासाठी हे पाऊल शासनाने उचलले आहे. मात्र, नागरिकांना या प्रणालीचे ज्ञान नसल्याने त्याचे विविध परिणाम दिसून येत आहेत. थकलेली दंडवसुली हा त्याचाच भाग आहे. ही ई-चलान प्रणाली पुण्यात 29 मार्चपासून लागू करण्यात आली आणि 19 ऑगस्टपासून पुणे पोलिसांनी मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण प्रणाली कक्ष सुरू केला. या नियंत्रण कक्षातून शहरातील 1230 सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीचे नियोजन केले जाते. पुणे वाहतूक नियंत्रण कक्षाचा शुभारंभ पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांच्या उपस्थितीत राज्याचे पोलिस महानिरीक्षक अशोक माथूर यांच्याहस्ते करण्यात आला होता.
दंडाची रक्कम भरण्याचे विविध मार्ग
आजही हजारो नागरिकांमध्ये वाहतूक पोलिसांनी त्यांना ई-चलान का पाठवले व त्याची रक्कम कशी भरावी याबाबत अज्ञान आहे. नागरिकांमध्ये याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. यामुळेच वाहतूक पोलिसांची मोठी दंड रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहन चालकांची नोंद मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण प्रणाली कक्षाकडून केली जाते. यानंतर एसएमएसद्वारे संबंधित वाहन चालकांना ई-चलान आल्यावर दंडाची रक्कम भरावी लागते. ही दंडाची रक्कम भरण्याचे विविध मार्ग आहेत. पुणे पोलिसांचे वाहतूक विभागाचे संकेतस्थळ असून, त्यावरूनदेखील हा दंड भरता येऊ शकतो. तसेच वाहतूक पोलिसांचे मोबाईल अॅप, विभागीय वाहतूक कार्यालय आणि वोडाफोनच्या सेंटरर्समध्येही दंडाची रक्कम स्वीकारली जाते.