बेस्टचा संप मिटत नसतांना उद्यापासून ओला-उबर चालकांचा संप !

0

मुंबई- बेस्ट कर्मचा-यांनी ७ जानेवारीपासून विविध मागणीसाठी संप पुकारला आहे. आज संपाचा ७ वा दिवस आहे. अद्यापही संप मिटण्याचे चिन्ह नाही. दरम्यान ओला-उबरच्या चालकांनीही सोमवारपासून संपाचा इशारा दिला आहे. यापूर्वी पुकारलेल्या संपाबद्दल पाच हजार चालकांना शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस मागे न घेतल्यास सोमवारपासून संप सुरू करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

विविध मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये संप केला होता. हा संप जवळपास १२ दिवस चालला होता. अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अधिवेशन संपून प्रदीर्घ काळ उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. परिणामी ओला, उबर चालक पुन्हा संपावर जाणार आहेत.

ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या मागण्यासाठी पुन्हा एकदा ओला, उबर चालकांनी संप पुकारलेला आहे.