स्थायी समिती अध्यक्षांच्या सूचना
मुंबई : आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या सन 2019-20चा अर्थसंकल्प स्थायी समितीत कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या भाषणात बेस्टच्या कामकाजासंदर्भात अनेक उपयुक्त सूचना केल्या. हा अर्थसंकल्प यापुढे पालिका सभागृहात मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून यावेळी अनेक सदस्यांनी सभागृहात अर्थसंकल्पावर बोलण्याची इच्छा प्रकट केली आहे.
स्थायी समितीत 6124.82 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करत असताना बेस्टसाठी आर्थिक मदतीबाबत मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. परंतू, बेस्ट कर्मचार्यांना त्वरित सानुग्रह अनुदान देण्यात यावे, असे आदेश यशवंत जाधव यांनी केले आहेत.अर्थसंकल्पावरील भाषणात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विद्युत पुरवठा विभाग तसेच परिवहन विभागासाठी अनेक उपयुक्त सूचना केल्या. त्यामध्ये विद्युत विभागाचे महसूल वाढवण्यासंदर्भात दक्षिण मुंबईत होत असलेल्या उत्तुंग इमारतींसाठी विद्युत पुरवठा करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे सुचवले. तसेच वीजचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याला अटकाव घालण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याची सूचना केली. जुन्या वीजमापनामुळे उपक्रमाच्या उत्पन्नांमध्ये घट होत असल्याने नवीन प्रणालीची वीजमापके लावण्याबाबत अग्रक्रमाने कारवाई करण्याचे त्यांनी सूचित केले. रस्त्यावर खोदकाम करवून तारखंड टाकण्याकरता पालिकेकडून शुल्क सवलत मिळवण्यासाठी सवलत मिळावी, त्याचबरोवबर मोनो व मेट्रो यांना विद्युत पुरवठा करण्याबाबत बेस्टने पालिका व शासनाबरोबर चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
बेस्टची परिवहन सेवा आर्थिक बाबतीत सक्षम व्हावी यासाठी ज्याप्रमाणे शासनाकडून एस.टी. महामंडळास आर्थिक सहकार्य करण्यात येते, त्याचप्रमाणे विविध करांमधून सूट देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. खाजगी कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या कर्मचार्यांसाठी बसगाड्या उपलबध करून दिल्यास, त्यामुळे महसूल वाढण्यास मदत होईल. त्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. खासगी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पालिकेने सहकार्य करावे
बेस्ट उपक्रमाने वीज निर्मिती क्षेत्रामध्ये पाय रोवण्याकरता स्वतंत्र ध्येय निश्चित करावे यासाठी पवन ऊर्जा, अणू ऊर्जा, कचर्यापासून वीज निर्मिती अशा विविध पर्यायांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बेस्टने स्वतंत्रपणे वीज निर्मिती करण्याकरता भूखंड उपलबध करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने त्यांना सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली.
बेस्टला स्वतंत्र मार्गिका हवी!
पालिकेकडून बांधण्यात येणार्या सागरी किनारा मार्गावर बेस्ट बसेससाठी स्वतंत्र मार्गिका आरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने बेस्टने प्रयत्न करावेत तसेच मुंबईतील सर्व द्रुतगती मार्गांवरील स्वतंत्र मार्गिका आरक्षित ठेवाव्यात. यामुळे बेस्टची सेवा जलद गतीने होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल आणि बेस्टच्या महसुलात वाढ होण्यास मदत होईल, असे जाधव यांनी सांगितले.