बेस्टच्या एसी बस जाणार भंगारात

0

मुंबई । गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक घाट्यात असलेल्या बेस्टच्या ताफ्यात वातानुकूलित बस विकत घेतल्या होत्या. या बस गाड्यांमुळे बेस्ट आणखीणच तोट्यात जात असल्याने तब्बल 259 वातानुकूलित बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. आता या बसगाड्या भंगारात काढल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बेस्टला आर्थिक खाईत ढकलण्यात मोठा वाटा असलेल्या या बसगाड्या गेल्या काही वर्षांपासून जागेवरच उभ्या आहेत. या सर्व गाड्यांचे आयुष्य संपले असल्यामुळे त्या जशा आहेत त्याच अवस्थेत भंगारात काढाव्यात, असा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने तयार करून समितीच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. बेस्ट उपक्रमाने 2009 मध्ये वातानुकूलित बस खरेदी केल्या होत्या. मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आणि नेहमीच नादुरूस्त होणार्‍या गाड्यांमुळे बेस्ट तोट्यात जात होती.

खासगी वाहनांतून फिरणार्‍या प्रवासी वर्गाला खेचण्यासाठी बेस्टने ही सेवा सुरू केली. मात्र सुरुवातीपासूनच या बस सेवेला अल्पप्रतिसाद मिळाला. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होऊ लागल्याने वातानुकूलित बस बेस्टसाठी पांढरा हत्ती ठरू लागल्या. तरीही नगरसेवकांचा दबाव आणि प्रतिष्ठेखातर या बस सुरू राहिल्या. यामुळे बेस्टची आर्थिक तूट दरवर्षी वाढत गेली. या एका बसची किंमत 55 ते 65 लाख रुपये होती. मात्र या बस नादुरुस्त होणे, वारंवार बंद पडणे असे प्रकार घडू लागले. या बसच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन गाडीला आग लागण्याच्या घटनाही घडल्या. अखेर बेस्टला टाळे लागण्याची वेळ आल्याने बेस्टने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार सर्वप्रथम वातानुकूलित बस बंद करण्यात आल्या.

दुरुस्तीसाठी लागणारा खर्च अधिक
वातानुकूलित बस एप्रिल 2017 पासून चालवणे बंद करण्यात आले आहे. वातानुकूलित गाड्यांचे आयुर्मान 10 वर्षे असते. या सर्व गाड्यांचे आयुर्मान 7 वर्षांहून अधिक आहे. या गाड्या अ‍ॅल्युमिनियमच्या नसून लोखंडी असल्यामुळे मुंबईच्या दमट हवामानात त्यांना गंज चढला आहे. त्यामुळे या गाड्या दुरुस्त केल्याशिवाय चालवता येणार नाहीत. मात्र सांगाड्याच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च करणे आता बेस्ट उपक्रमाला परवडणारे नाही. तसेच या बस अधिक काळ चालणार नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.