मुंबई । केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत बेस्टने आपल्या ताफ्यात 40 मिडी वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी ह्या बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार असून केंद्र सरकारतर्फे प्रत्येक बसगाडीमागे 60 टक्के अनुदान बेस्टला मिळणार आहे. संपूर्णपणे विजेवर चालणार्या या मिडी बसगाड्या असून, या वातानुकूलित बसगाड्या एमपी एन्टरप्रायझेस बेस्टला पुरवणार आहे. याअगोदर बेस्ट समितीने 20 बिगर वातानुकूलित बसगाड्या व 20 वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या याच फेम इंडिया योजनेंतर्गत भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मान्यता दिली होती.
बसगाडीची वैशिष्ट्ये
संपूर्ण वातानुकूलित बसगाड्या, बस रस्त्यावरून जात असताना बाहेर धूर सोडत नाहीत, बस गाड्यांना कमीत कमी आवाज असल्यामुळे बस प्रवाशांना आवाज विरहित प्रवासाचा सुखद अनुभव, या बसगाड्यांना इतर बसगाड्यांची तुलनेत कमी देखभालीची आवश्यकता असते. बसगाडीच्या प्रवर्तनामध्ये घट.
एका बसगाडीची किंमत सरासरी 1 कोटी 67 लाख
40 बसगाड्यांनाच संमती मिळाली असून, एका बसगाडीची किंमत सरासरी 1 कोटी 67 लाख रुपये आहे त्यातील 1 कोटी रुपये बेस्टला अनुदान स्वरूप मिळणार आहेत. म्हणजे एकूण 40 कोटी रक्कम बेस्टला मिळणार आहे. या बसगाडीच्या बॅटरीचा खर्च हा या बसच्या किमतीच्या 60 टक्के आहे तसेच या बसगाडीवर आयात केलेल्या महागडे भाग बसवले असून, हे तंत्रज्ञान नवीन आहे व या बसच्या आयुर्मानाबद्दल अनिश्चितता असून या बसगाड्या दुरुस्त्या करण्यासाठी बेस्टकडे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने बेस्टने या बसगाड्या स्वतः खरेदी न करता भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरवले आहे.